एकच प्रश्ऩ़ आमच्या शेतकरी बापानं जगायचं कसं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:30 AM2019-02-12T11:30:28+5:302019-02-12T11:38:09+5:30
अरुण वाघमोडे अहमदनगर : ‘कळत्या वयापासून शेतात राबणा-या आई-बापांना पाहिलं. दिवसरात्र कष्ट करूनही हातात चार पैसेही पडत नाहीत़ माझ्याच ...
अरुण वाघमोडे
अहमदनगर : ‘कळत्या वयापासून शेतात राबणा-या आई-बापांना पाहिलं. दिवसरात्र कष्ट करूनही हातात चार पैसेही पडत नाहीत़ माझ्याच बापाची नव्हे तर सा-या शेतक-यांचीच ही व्यथा़ शाळेच्या ‘फी’साठी बापाकडे पैसे मागताना जीव कासावीस होतो़ या व्यवस्थेत आमच्या शेतकरी बापानं जगायचं कसं अन् कुटुंबाचं पालन करायचं कसं? या एकाच प्रश्नाचा सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही तिघी मैत्रिणींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे़ आमच्या आंदोलनाचा शेवट काय होईल हे माहित नाही़़़पण शेतकºयाची कन्या आता जागृत होऊन सरकारला जाब विचारत आहे हे तरी सर्वांना समजेल’ अशी वेदना पुणतांबा येथे शेतकºयांच्या प्रश्नासाठी उपोषण करत असलेल्या शुभांगी संजय जाधव या शेतकरी कन्येने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़
पुणतांबा (ता़ राहाता) येथे गेल्या पाच दिवसांपासून शेतक-यांच्या प्रश्नांसाठी शुभांगीसह निकिता धनंजय जाधव व पूनम राजेंद्र जाधव या शेतकºयांच्या मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे़ शुभांगी हिची प्रकृती खालावल्याने तिला गुरूवारी रात्री जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ शुभांगीने मात्र रूग्णालयातही उपोषण सुरूच ठेवले आहे़ सरकार जोपर्यंत सर्व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही असा निश्चय शुभांगी हिने केला आहे़
शुभांगी हिने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी येतात आणि उपोषण मागे घ्या़़ अशी विनंती करतात़ मात्र ‘सर्व मागण्या मान्य केल्या आहेत’ असे लेखी आश्वासन कुणीच देत नाहीत़ आम्ही तिघी मैत्रिणींचे आई-वडील शेती करतात़ शेतकºयांची व्यथा आणि वेदना आम्ही बालपणापासून पाहत आहोत. उपोषणाचा निर्णयही आमचा तिघींचाच होता़ शेतकºयांसाठी उपोषण करा असे आम्हाला कुणीही सुचविले नव्हते़ आम्हाला उपोषण करताना पाहून आमच्याच नव्हे तर सर्वच शेतकरी माता-पित्यांचा जीव तीळ-तीळ तुटत आहे. उपोषण मागे घ्या अशी विनवणी प्रत्येक जण करत आहे़ पण शेतकरी बापासाठी अन्नत्याग करण्याचा निश्चय केला आहे़ यापासून आम्हाला आता कुणी रोखू शकत नाही़. सरकारला खरंच शेतक-यांची काळजी असेल तर मागण्यांची पूर्तता करून अंमलबजावणी करावी़ तेव्हा उपोषण मागे घेऊ़
कोण आहेत या कृषिकन्या
शुभांगी ही कोपरगाव येथील एस़एस़जी.एम महाविद्यालयात एस.वाय.बी.एस्सीचे शिक्षण घेत आहे़ पूनम शुभांगीच्याच वर्गात आहे तर निकिता ही पुणे येथे ‘लॉ’चे शिक्षण घेत आहे़ या तीनही मुली १९ ते २० या वयोगटातील असून, त्यांचे आई-वडील पुणतांबा येथे शेती करतात़
शेतक-यांचे दु:ख समजण्याइतपत आम्ही मोठ्या आहोत
आमच्या मायेपोटी बहुतांश जण सांगतात की, तुम्ही अजून लहान आहात़ आधी शिक्षण करून घ्या मग आंदोलन करा, पण शेतकºयांचं दु:ख समजण्याइतपत आम्ही नक्कीच मोठ्या आहोत़ शेतकºयांच्या प्रश्नांसाठी उद्या महाराष्ट्रातील सर्व कृषिकन्या बाहेर पडल्या तर आमच्या आंदोलनाचे हे मोठे फलित असेल असे शुभांगी हिने सांगितले़
जगणं सुकर व्हावं याच मागण्या
शेतकरी या सरकारकडे फुकट काहिच मागत नाही़ शेती करून किमान स्वाभिमानाने जगता यावे याच आमच्या मागण्या आहेत़ शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, कृषीसंलग्न वस्तूंवरील जीएसटीतून माफी, सिंचन, शेती अवजारांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाला योग्य दर अशा आमच्या मागण्या असल्याचे शुभांगी हिने सांगितले़