कर्डिले, शेळके यांची एकहाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:22 AM2021-01-19T04:22:45+5:302021-01-19T04:22:45+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील दिग्गजांनी सत्ता कायम राखल्या. माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कार्ले, ...
केडगाव : नगर तालुक्यातील दिग्गजांनी सत्ता कायम राखल्या. माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, संदेश कार्ले, माधवराव लामखडे, गोविंद मोकाटे यांनी आपल्या गावातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांच्या गटाचा दारुण पराभव झाला असून बाळासाहेब हराळ यांच्या गुंडेगावमधील सत्तेच्या चाव्या अपक्ष उमेदवाराच्या हातात गेल्या.
भाजप व महाविकासआघाडी यांच्यात चुरस झाली. दोन्ही पक्षांनी जवळपास समसमान गावांत सत्ता काबीज केली आहे. बुर्हाणनगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात पुतणे रोहिदास कर्डिले यांनी आव्हान उभे केले होते. शिवाजी कर्डिले यांनी सर्व जागा जागांवर बाजी मारली. खारे कर्जुने येथे प्रताप शेळके व अंकुश शेळके यांच्या गटाच्या सर्व जागा निवडून आल्या. टाकळी काझी येथे संपतराव म्हस्के यांची सत्ता संपुष्टात आली. भोरवाडीत माजी सभापती रामदास भोर यांच्या गटाचा पराभव झाला.
निंबळक येथे माधवराव लामखडे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. नवनागापूर येथे माजी पंचायत समिती सदस्य बबनराव डोंगरे व दत्ता पाटील सप्रे हे विरोधक एकत्र आल्याने तेथे विरोधी शिवसेना आघाडीचा दारुण पराभव झाला. चिचोंडी पाटील येथे पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे व भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी गावाची सत्ता पुन्हा खेचून आणली. तांदळी वडगाव येथे बाजार समितीचे सभापती अभिलाष घीगे व रमेश ठोंबरे हे विरोधक एकत्र आल्याने त्यांनी विरोधी आघाडीचा धुव्वा उडविला.
इमामपूर येथे गोविंद मोकाटे यांनी १० वर्षांची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. दरेवाडी येथेही सरपंच अनिल करांडे व भानुदास बेरड यांनी २० वर्षांची सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. वाकोडी येथे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी आपली पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. देहरे येथे पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल काळे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. कामरगाव येथे रावसाहेब साठे यांच्या २० वर्षांच्या सत्तेला सुरुंग बसला. वाटेफळ येथे २० वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. वाळूंज येथे उपसभापती संतोष म्हस्के, महेंद्र हिंगे, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर यांच्या गटाने एकतर्फी बाजी मारली.
..................
अनेक गावांत गड आला पण सिंह गेला
निंबळक येथे लामखडे यांची सत्ता आली, पण लामखडे यांच्या सून पराभूत झाल्या. खंडाळा येथे संदेश कार्ले यांची सत्ता आली पण त्यांच्या बंधूला पराभव स्वीकारावा लागला. रुई येथे भाजपची सत्ता आली पण नेतृत्व करणारे माजी सरपंच रमेश भामरे पराभूत झाले. पिंपळगाव माळवी येथे भाजपची सत्ता आली, पण नेतृत्व करणारे विश्वनाथ गुंड यांच्या पत्नीचा पराभव झाला.
...........
एका मताने केली जादू
लामखडे यांच्या सुनेचा एका मताने पराभव झाला. इसळक येथे बाबासाहेब गेरंगे यांचाही एका मताने पराभव झाला. नवनगापूर येथे सेनेचे नेते अप्पासाहेब सप्रे फक्त एका मताने निवडून आले. रुई येथे सेनेच्या रोहिणी गोरे एका मताने पराभूत झाल्या. रतडगाव येथील सुषमा भोपे समान मते पडल्याने चिठ्ठीवर निवडून आल्या.