पद्मश्री पोपटराव पवार यांना एकतर्फी कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:22 AM2021-01-19T04:22:51+5:302021-01-19T04:22:51+5:30
केडगाव : गेल्या ३५ वर्षांनंतर आदर्शगाव हिवरेबाजार येथे झालेल्या निवडणुकीत गावकऱ्यांनी एकमताने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या बाजूने एकतर्फी कौल ...
केडगाव : गेल्या ३५ वर्षांनंतर आदर्शगाव हिवरेबाजार येथे झालेल्या निवडणुकीत गावकऱ्यांनी एकमताने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या बाजूने एकतर्फी कौल देऊन गावाची सत्ता पुन्हा त्यांच्याच ताब्यात दिली आहे. विरोधी आघाडीला आपल्या अनामत रकमाही वाचवण्यात यश मिळाले नाही.
आदर्शगाव हिवरेबाजार येथे ३५ वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक झाली. या गावाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यात पवार यांनी एकतर्फी बाजी मारत आपली सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. यावेळी त्यांच्या गावातील काही विरोधकांनी एकत्र येत पवार यांच्या सत्तेला आव्हान दिल्याने या गावाची ३० वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडित झाली. मात्र, गावात निवडणूक लागल्याचा उलट परिणाम ग्रामस्थांमध्ये दिसून आला. निवडणूक लागल्याने गावकरी तसेच गावातील तरुण नाराज झाले. त्यांची नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली. या गावात सुमारे ९२ टक्के विक्रमी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान पवार यांच्या फायद्याचे ठरले. गावात एकूण ७ जागा होत्या. त्या सर्व जागा पवार यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या. विरोधी गटाच्या उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. पवार यांना २८२ तर त्यांचे विरोधी किशोर सुंबळे यांना फक्त ४४ मते पडली.
.....
या निवडणुकीचा अनुभव खूप काही शिकवून गेला. आता मी मोकळा झालो. कारण, गाव सांभाळणारी तरुणांची पिढी या निवडणुकीने गावात तयार झाली. आता गावात कोणतीच राजकीय धुसफूस असणार नाही. गावासाठी आपले आयुष्य झोकून देणाऱ्यांना जर संघर्ष करावा लागत असेल, तर विचार करण्यासारखी बाब आहे. पैशांच्या जोरावर जर निवडणुका जिंकून कोणी सत्तेत येत असेल व गावासाठी खस्ता खाणारे बाजूला होत असतील, तर निवडणूक प्रक्रिया बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
-पोपटराव पवार, हिवरेबाजार, ता. नगर