संगमनेरात एक हजार किलो गोवंशाचे मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:37 PM2018-04-14T14:37:38+5:302018-04-14T14:39:36+5:30
कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी (गल्ली क्रमांक नऊ) येथे घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन वाहनांसह एक हजार किलो गोवंशाचे मांस जप्त केले.
संगमनेर(जि. अहमदनगर) : कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी (गल्ली क्रमांक नऊ) येथे घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन वाहनांसह एक हजार किलो गोवंशाचे मांस जप्त केले. याप्रकरणी तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कमरअली सौदागर व त्याचे तीन साथीदार (नावे माहित नाहीत) अशा एकूण चार जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व संशयीत आरोपी पसार झाले आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी येथे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती शुक्रवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मिळाली. त्यानंतर तात्काळ त्यांनी घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहून गुन्हा दाखल झालेले सर्व संशयीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी तेथून १ लाख रूपयांचे एक हजार किलो गोवंश जनावरांचे मांस, चार लाख रूपये किंमतीचे चारचाकी वाहन (एम.एच. ०१, बी. टी. ६७९४), पन्नास हजार रूपये किंमतीची रिक्षा (एम. एच. १२ जे. ५३९८) व चाळीस हजार रूपये किंमतीची मोटारसायकल (एम. एच. १७, ए. टी. ९६४३) असा एकूण ५ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, ईस्माइल शेख, सचिन उगले, सागर धुमाळ, अजय आठरे, सुनील ढाकणे यांचा समावेश होता.