‘सेंट विवेकानंद’ लावणार एक हजार झाडे

By Admin | Published: July 10, 2016 12:35 AM2016-07-10T00:35:03+5:302016-07-10T00:35:25+5:30

सेंट विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबत जागृती केली. शाळेच्या मैदानावर २५ झाडे लावली.

One thousand trees will be planted by 'Saint Vivekanand' | ‘सेंट विवेकानंद’ लावणार एक हजार झाडे

‘सेंट विवेकानंद’ लावणार एक हजार झाडे

अहमदनगर : झाडांचीच गाणी.... अन् झाडांचाच संदेश.... झाडांचे महत्त्व सांगणाऱ्या विविध वेशभूषेतील नाटिका आणि नृत्य.... झाडांचाच देव अन् झाडांचीच आरती सादर करून सेंट विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबत जागृती केली. शाळेच्या मैदानावर २५ झाडे लावली. त्याला ट्री गार्ड बसविले आणि त्यावर झाडे वाचविण्याचे संदेश चिटकविले. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या मिळून १ हजार ५० झाडे शहराच्या विविध भागात लावण्याचा संकल्प संस्थेचे सचिव दामोधर बठेजा यांनी केला.
‘ग्रीन अहमदनगर’साठी लोकमतने ‘माय सिटी-माय ट्री’ अभियान राबविले आहे. या अभियानात तारकपूर येथील सेंट विवेकानंद स्कूलने सहभाग नोंदविला. शाळेच्या मैदानात शनिवारी २५ झाडे लावून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गिरीधारीलाल मध्यान, सचिव दामोधर बठेजा, संचालक दामोधर माखिजा, राम एजन्सीचे संचालक व उद्योजक राम मेंघाणी, ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक सुदाम देशमुख, प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी,वर्षा आहुजा यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बठेजा म्हणाले, शहर हिरवे झाले पाहिजे, यासाठी एक झाड लावणाऱ्यांचेही छायाचित्र छापून ‘लोकमत’ने वृक्षारोपण चळवळीला मोठी गती दिली आहे. या अभियानामुळे शहरातील झाडांची संख्या वाढण्यात निश्चितच मदत होणार आहे. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक संख्या मिळून १ हजार ५० झाडे शहरात लावली जातील. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वाढदिवसाला शाळेतर्फे एक झाड भेट दिले जाईल. ते झाड त्याने त्याच्या घरासमोर किंवा कॉलनीत लावून त्याचे संगोपन करायचे आहे.
राम मेंघाणी म्हणाले, शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून झाडांबाबत केलेली जागृती कौतुकास्पद आहे. बालवयातच झाडे लावण्याचे संस्कार होणे आवश्यक आहे. असे कार्यक्रम सर्वच शाळांसाठी पथदर्शी आहेत.
शिक्षक संजय खरे यांनी लिहिलेली ‘सुखकर्ता दुखहर्ता, वाढता वृक्षांची’ ही आरती शिक्षक किरण पटारे यांनी सादर केली. या अप्रतिम आरतीला उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाचे निवेदन मानसी जगताप, आर्या डाळवाले, भागवत दोहे, प्रज्वल भोर यांनी केले. झाडांबाबत जागृती करण्यासाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. त्यातील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ‘यू कट ट्री, ट्री कट युवर लाईफ’, ‘सेव्ह ट्री, सेव्ह अर्थ’अशी घोषवाक्ये मुलांनी लिहिली होती. प्रतिनिधी)
साजरा करा ‘ग्रीन संडे’
‘ग्रीन अहमदनगर’साठी एक झाड, असे आवाहन केल्यानंतर ‘लोकमत’च्या ‘माय सिटी माय ट्री’ या अभियानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत शहर व परिसरात १५ हजार झाडांची लागवड झाली आहे. याहीपुढे हे अभियान सुरूच राहणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात रविवारी झाडे लावून आपली सुटी सार्थकी लावावी, असे आवाहन करण्यात येत आहे. लावलेल्या झाडांसह आपले छायाचित्र इ-मेल पत्त्यावर पाठवावे किंवा लोकमत भवन, पत्रकार चौक, नगर-मनमाड रोड येथे समक्ष आणून द्यावे. अधिक माहितासाठी ‘माय सिटी-माय ट्री’ च्या निलेश घोलप यांच्याशी (मोबाईल क्रमांक ९१७५५७५७५५) संपर्क साधावा. या छायाचित्रांना ‘लोकमत’मधून प्रसिद्धी दिली जाणार आहे.

Web Title: One thousand trees will be planted by 'Saint Vivekanand'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.