मायंबा घाटात कार कोसळून एका महिलेचा मृत्यू; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 07:20 PM2019-12-16T19:20:08+5:302019-12-16T19:20:32+5:30
मढी-मच्छिंद्रनाथगडाच्या रस्त्यावरील मायंबा घाटातील ८० फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी आहेत.
मढी : पाथर्डी तालुक्यातील मढी-मच्छिंद्रनाथगडाच्या रस्त्यावरील मायंबा घाटातील ८० फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी आहेत. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. कार मच्छिंद्रनाथगडाकडून खरवंडीकडे (ता. पाथर्डी) चालली होती.
बकुळा लक्ष्मण वाघ (वय ४८, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. माधुरी वसंत खाडे (वय ३२, रा. खेड, जि. सातारा), असे एका जखमी महिलेचे नाव आहे. ही महिलाच कार चालवत असल्याची माहिती मिळाली. इतर दोन जखमींची नावे समजू शकली नाहीत.
मूळचे सातारा जिल्ह्यातील भाविक मच्छिंद्रनाथ गडावर देवदर्शन आटोपून खरवंडी (ता. पाथर्डी) येथे कारमधून पाहुण्यांकडे चालले होते. कारमध्ये चौघे होते. यामध्ये दोन महिला व दोन पुरुष होते. माधुरी खाडे या कार चालवत होत्या. घाट उतरत असताना कार ८० फूट खोल दरीत कोसळली. यात कार चालक माधुरी खाडे या जखमी झाल्या. दोन इतर प्रवासीही गंभीर जखमी असून त्यांच्यावर पाथर्डी येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती कळताच मढी येथील बबनराव मरकड, रवी आरोळे, रोहित अकोलकर, असिफ शेख, सोहेल मोमीन, आकाश साळवे आदींसह पोलीस प्रशासनाने जखमींना मदत केली. निमुळत्या रस्त्याचा व धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घाटातून जाणाºया रस्त्याला संरक्षक कठडेही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
याबाबत मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे म्हणाले, दोन्ही देवस्थानच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त मालिका लिहून लक्ष वेधले होते.
--