बाजार समितीसमोर कांद्याची होळी; श्रीरामपुरात आंदोलन
By शिवाजी पवार | Published: March 6, 2023 01:52 PM2023-03-06T13:52:43+5:302023-03-06T13:53:15+5:30
केंद्र व राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर येथील बाजार समितीसमोर सोमवारी सकाळी कांद्याची होळी केली. कांद्याच्या पडलेल्या दरामुळे केंद्र व राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे, अहमद जहागीरदार, विलास कदम, गणेश छल्लारे, संदिप उघडे, मनोज लबडे, बाजीराव ठोंबरे, कानिफनाथ चव्हाण, बाबासाहेब हारगुडे आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घातलेल्या होत्या. याप्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला चालना द्यावी, उत्पादन खर्चावर आधारित अडीच हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर द्यावा तसेच कमी दराने झालेल्या कांदा खरेदीवर फरकाचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यांवर वर्ग करावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी स्वत:हून पुढे येत आपापल्या भागात कांदा दराच्या प्रश्नावर आंदोलन करावे, अशी मागणी यावेळी बाळासाहेब पटारे यांनी केली. सरकारी कार्यालयांच्या दारात कांद्याची माळ घालून निषेध नोंदवावा, तसेच मोटारसायकल, ट्रॅक्टर यांना कांद्याच्या
माळा घालून आंदोलनाची धार वाढवावी, असे आवाहन पटारे यांनी केले.