कांद्याने केली लाखोंची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:29 PM2018-04-13T12:29:43+5:302018-04-13T13:40:00+5:30
एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील तरुण शेतकरी संतोष रामदास पालवे याने साधली.
अशोक मोरे
पाथर्डी : एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील तरुण शेतकरी संतोष रामदास पालवे याने साधली. आजही त्यांच्याकडे चार एकर कांदा तयार झाला आहे.
दहा वर्षापासून कांद्याचे उत्पन्न घेत असलेल्या संतोष पालवे या शेतकऱ्यास काही वेळा मोठा तोटा झाला. मुलांचे शिक्षण व संसारातील गरजा भागविता-भागविता मेटाकुटीस आलेल्या संतोषने जिद्द व मेहनतीच्या बळावर कांद्याचे भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपयांची कमाई केली. आजही चार एकरात त्यांनी कांद्याची लागवड केलेली आहे. याविषयी संतोष पालवे म्हणाले, चार एकर कांदा करताना मला रोप, लागवड, खते, फवारणी यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च आला. कांद्याला कोणती व किती खते वापरायची हे मी अनुभवातून शिकलो. कोणत्याही कृषीतज्ज्ञांची किंवा कृषी खात्याची मदत मी घेतली नाही. गादी वाफे करून त्यात कांद्याच्या रोपांची लागवड केली. विजेच्या लहरीपणामुळे रात्री-बेरात्री कांद्याला पाणी दिले. यात माझी पत्नी मंदा हिचा मोठा हातभार लागला. एकरी ३०० ते ३५० गोण्यापर्यंत उत्पन्न काढले. कांदा साठविण्यासाठी माझ्याकडे कांदा चाळ नाही. यामुळे मला मोठा आर्थिक फटकाही बसला. कांद्याचा भाव वाढला काय? आणि घसरला काय? याची चिंता न करता उत्पन्न घेतल्यास कांदा पीक शेतक-यांच्या फायद्याचे असून लाल कांद्याने अनेक शेतकरी मालामाल झाल्याचे त्यांनी सांगितले.
आज माझ्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. यातूनच भविष्यात शेड बांधून बंदिस्त शेळीपालन करण्याचा माझा मानस असून कृषी विभागाने मला मार्गदर्शन केल्यास ते मोलाचे ठरू शकेल. यातून माझ्या पिकासाठी लागणा-या खताचा प्रश्न सुटून मी यापेक्षा जास्त उत्पन्न काढू शकेल, असे त्यांनी सांगितले.