कांद्याचे भाव कोसळले; राहाता येथे शेतक-यांनी अडविला नगर-मनमाड महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 06:29 PM2018-02-27T18:29:22+5:302018-02-27T18:29:47+5:30
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याचे भाव ढासळल्यामुळे संतप्त शेतक-यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर बाजार समिती संचालक व व्यापा-यांनी यावर तोडगा काढत ६०० रुपयांवरुन कांद्याचे भाव १२०० रुपयांपर्यंत वाढविले.
राहाता : राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याचे भाव ढासळल्यामुळे संतप्त शेतक-यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर बाजार समिती संचालक व व्यापा-यांनी यावर तोडगा काढत ६०० रुपयांवरुन कांद्याचे भाव १२०० रुपयांपर्यंत वाढविले. त्यानंतर शेतक-यांनी हे आंदोलन मागे घेतले.
राहाता बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी कांदा लिलाव सुरु झाले. राहाता बाजार समितीत नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर येथील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. अकरा वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले. व्यापा-यांनी एक नंबर कांद्याला सहाशे रुपये भाव काढला. त्यामुळे शेतक-यांनी संतप्त होत घोषणाबाजी सुरु करीत लिलाव बंद पाडले. त्यानंतर संतप्त शेतकरी बाजार समितीच्या गेटसमोरील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या दुरवर रांगा लागल्या होत्या. बाजार समितीचे संचालकांनी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतक-यांनी बाजारभाव वाढवून मागण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे बाजार समिती संचालकांनी व्यापा-यांशी चर्चा करुन कांद्याचे फेरलिलाव करण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत शिवप्रहार संघटनेचे सचिव चौघुले, बाजार समितीचे अध्यक्ष बापूसाहेब आहेर, सचिव उद्धव देवकर यांनी शेतक-यांशी संवाद साधला व भाव वाढ देण्याचे मान्य केले. त्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले आणि लिलाव पुन्हा सुरु झाले. फेरलिलावात एक नंबर कांद्याला १२०० रुपये भाव काढण्यात आला.