कांद्याचे भाव कोसळले; घोडेगावला शेतक-यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 04:30 PM2019-09-21T16:30:01+5:302019-09-21T16:31:00+5:30
६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
घोडेगाव : ६० रुपये किलोचा भाव असलेल्या कांद्याचे भाव ३८ ते ४२ रुपयांपर्यंत अचानक गडगडले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतक-यांनी घोडेगाव येथे शनिवारी दुपारी बारा ते एक वाजेदरम्यान लिलाव बंद पाडला. यावेळी नगर-औरंगाबाद रस्त्यावर शेतक-यांनी बैठक मारुन एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
कांद्याला भाव वाढवून द्या, शेतक-यांची अडवणूक करु नका. असे म्हणत शेतकरी रस्त्यावर आले. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ कोरडे कार्यालयात ठाण मांडून बसले होते. महाराष्ट्रातील अनेक बाजार समितीत सध्या कांद्याला चांगला बाजार मिळत आहे. आॅनलाईन भाव दिसत असताना घोडेगाव बाजारात भाव का पडतात? शेतकरी आपलाच आहे. त्यांच्यामुळेच बाजार समिती, व्यापारी, आडते आहेत. जाणून भाव पाडू नका, बाजारचे नाव खराब करु नका. चांगल्या मालाला किमान बोली चार हजार क्विंटलपासून सुरु करा, असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जगन्नाथ कोरडे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी नेवासा बाजार समितीचे संचालक बाळासाहेब उंडे, चंद्रकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन सोनवणे, आडतदार सुदाम तागड, राजेंद्र ब-हाटे, संतोष सोनवणे यांनी शेतक-यांशी चर्चा करुन योग्य तो भाव देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कांद्याचे आॅनलाईन भाव पाहून साडेतीन हजार रुपये बोलीच्या अटींवर लिलाव सुरू झाले. त्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
दोनशे ट्रक कांद्याची आवक
घोडेगाव उप बाजार समितीचे शाखाधिकारी एस.एम.भवार यांनी आडतदारांनी भाव वाढवून उच्चतम भाव द्यावा यासाठी चांगली ठोस भूमिका घेतली. आडतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला. यामुळे समितीत कांदा लिलाव पुन्हा सुरु झाले. शनिवारी किमान दोनशे ट्रक कांद्याची आवक झाली होती, असे भवार यांनी सांगितले.