लालपरीतून कांद्याची सवारी; अकोलेतून पहिली बस वाशी मार्केटला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:19 AM2020-06-09T11:19:41+5:302020-06-09T11:20:43+5:30
अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे.
हेमंत आवारी /
अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़. ८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे. अकोलेतील कांद्याची लालपरीतून झालेली सवारी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून कृषीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची सुविधा निर्माण केली आहे. एसटी बसने कृषीमाल सुखरुप शहरात पोहचविला जाणार आहे. त्यासाठी अकोले आगारात एक विशेष बस माल वाहतुकीसाठी तयार करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी ही बस अकोले येथून मुंबईला रवाना झाली. या बसमधून अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीतून ३०० कांदा गोण्या म्हणजेच सुमारे १२ टन कांदा मुंबई वाशी मार्केटकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरुण आभाळे यांनी दिली. शेतीमाल वाहतुकीसाठी बसेसची मागणी वाढताच आणखी बस तयार करण्यात येणार आहेत, असे अकोले आगाराकडून सांगण्यात आले.
कोरोनामुळे एसटीने प्रवास करण्यास प्रवासी धजावत नाहीत. तालुकाअंतर्गत प्रवासासाठी एसटी़ बसच्या फे-या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद पडली आहे. १ जूनपासून एकही बस तालुक्यात धावलेली नाही.
तोटा भरुन काढण्याचा प्रयत्न
एस़ टी़ महामंडळाच्या बसेस उभ्या असल्यामुळे आगाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच रिकाम्या किंवा कमी प्रवासी घेऊन बस सोडल्या तरी नुकसानीचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे शेतमाल घेऊन बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. किमान यातून तोटा भरुन निघू शकतो, असा अंदाज महामंडळाचा आहे.