नामांकित कंपनीचे कांदा बियाणे आढळले सदोष; तक्रार निवारण समितीचा अहवाल
By शिवाजी पवार | Published: January 3, 2024 03:30 PM2024-01-03T15:30:23+5:302024-01-03T15:30:34+5:30
शेतकऱ्याची पोलिसांत धाव
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : यावर्षीच्या रब्बी हंगामात नामांकित कंपनीच्या कांदा बियाणांची उगवण क्षमता नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर तालुका बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पाहणीमध्ये बियाणे सदोष आढळून आले. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांच्या शेतात कांदा बियाणांची उगवण झाली नाही. त्यानंतर त्यांनी याविरूद्ध लढाई लढली. जिल्हा बीज गुण नियंत्रण अधिकारी व कंपनीच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.
शेतकरी जगताप यांनी सहा किलो कांदा बियाणांची १६ ऑक्टोबर २०२३ मध्ये येथील एकाकृषी केंद्रातून खरेदी केली होती. बियाणे खरेदीचे बिल त्यांनी केंद्राकडून घेतले. कारेगाव येथील शेतात १० नोव्हेंबरला त्यांनी बियाणांची पेरणी केली. मात्र, २० वीस दिवस उलटूनही बियाणांची उगवण झाली नाही. त्यानंतर जगताप यांनी तालुका बियाणे तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली. पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी हे समितीचे कामकाज पाहतात.
समितीने शेतात बियाणांची पाहणी केली. त्यानंतर बाभळेश्वर (ता.राहाता) येथील पायरेन्सचे डॉ. व्ही.एस. घुले, तंत्र अधिकारी अमोल काळे, कृषी अधिकारी अविनाश चंदन, अजित आनंद, डी.आर. गागरे, तसेच शेतकरी भाऊसाहेब जगताप, सिद्धार्थ जगताप, राजेंद्र कुलकर्णी यांच्या समोर पंचनामा करण्यात आला. त्यात कंपनीचे बियाणे सदोष आढळून आले.
शेतकऱ्याच्या जमिनीवर कांद्याची केवळ पंधरा ते वीस टक्के उगवण झाल्याचे निदर्शनास आले. तसा अहवाल देण्यात तक्रार निवारण समितीने दिला आहे. अहवालाच्या अनुषंगाने जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.