काष्टीत क्रिकेटवर आॅनलाइन सट्टा : दहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:10 PM2018-05-18T18:10:00+5:302018-05-18T18:11:34+5:30
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पडत असतानाच या स्पर्धेतील सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावून काष्टी येथे बुकींवर पैशांचा पाऊस पडत होता. यातून आयपीएल सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी ९ जणांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
श्रीगोंदा : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पडत असतानाच या स्पर्धेतील सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावून काष्टी येथे बुकींवर पैशांचा पाऊस पडत होता. यातून आयपीएल सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी ९ जणांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
आयपीएलमध्ये कोण जिंकणार? कोण हरणार?, यावर काष्टीत लाखोंचा आॅनलाईन सट्टा लावणारी टोळी श्रीगोंदा पोलिसांनी शुक्रवारी तुळसाईनगरच्या महालक्ष्मी ठिबक सिंचनच्या दुकानातून रंगहाथ पकडली. या टोळीकडून ३९ हजारांची रोकड व ७२ हजार रूपये किमतीचे मोबाईल जप्त केले. गुरूवारी रात्री ८.३५ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पपू कैलास राहिंज, महेश गावडे, देवदास गोपीनाथ भिंताडे, शाहरूख इस्माईल जकाते, बाळासाहेब गव्हाणे, मल्हारी राहिंज, लिंबाजी भीमराव बल्लाळ, सूरज नानासाहेब सागर, अशोक पाचपुते, निहाल मेहबूब सय्यद (सर्व जण रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) यांना रंगेहात पकडून अटक केली. पोलीस काँस्टेबल संभाजी राऊत यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी या सट्टा बहाद्दराना खाकीचा झटका दाखविल्यानंतर त्यांनी मुंबई पुण्यातील सट्टा बाजाराची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे काष्टीच्या आयपी एल सट्टा बुकींचे मुंबई कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपासाची चक्रे फिरविणार आहेत.
आरसीबीविरूद्ध सनराईज हैदराबाद सामना सुरू असताना आरसीबीचे फलंदाज धावांचा पाऊस पाडत होते. आरसीबी जिंकणार म्हणून काष्टीत सट्टाबाजार तेजीत आला. मोबाईलवर आॅनलाईन सट्टा सुरू झाली. मैदानावर धावांचा पाऊस पडत असताना बुकींवर पैशांचा पाऊस पडू लागला. हा पैशांचा पाऊस पडत असतानाचा पोलिसांनी गाळ्याचे शटर्स वाजविले अन् आॅनलाइन सट्टा आॅफ झाला.