आॅनलाइन बदलीप्रकरण : दीड हजार गुरुजींचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 02:32 PM2018-07-04T14:32:00+5:302018-07-04T14:33:14+5:30
जिल्हा परिषदेच्या संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बदलीस अपात्र शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेकडून लवकरच जाहीर होणार आहे़
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बदलीस अपात्र शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेकडून लवकरच जाहीर होणार आहे़ त्यामुळे दोन्ही संवर्गांचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील दीड हजार गुरुजींचा जीव टांगणीला लागला आहे़
आॅनलाइन बदलीप्रक्रियेत संवर्ग १ व २ मधील अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत़ जिल्हा परिषदेकडून संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या किंवा नाकारलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मोहीम उघडली आहे़ जिल्ह्यातील संवर्ग १ मध्ये बदली करून घेतलेले व बदली नाकारलेल्या शिक्षकांची संख्या ९३८ इतकी आहे़ संवर्ग दोनमध्ये ६२३ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत़ संवर्ग एक व दोन मध्ये बदली झालेल्या शिक्षकांनी बदलीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची फेरतपासणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे़ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी १४ कर्मचाºयांची समिती स्थापन करण्यात आली असून, दहा तालुक्यांची तपासणी पूर्ण झाली आहे़ उर्वरित चार तालुक्यांतील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अपात्र शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून जाहीर करणार आहे़ बदली अपात्र शिक्षकांना खो दिल्यामुळे ज्यांची बदली झाली आहे, त्यांच्या जागी अपात्र शिक्षकांची नियुक्ती करणार आहे़ त्यामुळे विस्थापितांना त्यांच्या मूळ शाळेवर जाण्याची संधी मिळणार आहे़ त्यामुळे सोयीच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखल करणे गुरुजींना चांगलेच महागात पडणार आहे़
चारवेळा तपासणी करून पाटी कोरीच
संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या किंवा बदली नाकारणाºया शिक्षकांच्या कागदपत्रांची जिल्हास्तर, तालुका आणि पुन्हा जिल्हास्तरावर, अशी चारवेळा तपासणी करून झाली़ आता फेरतपासणीसाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत़
काय आहे संवर्ग-१ व संवर्ग २
बदलीत संवर्ग १ व २ मध्ये समावेश असलेल्यांना प्राधान्य असते़ संवर्ग-१ मध्ये अपंग, गंभीर आजार आदींचा समावेश असून, संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाचा समावेश आहे़
संवर्ग १- बदली झालेले
उपाध्यापक- ४६९, पदवीधर-३५, मुख्याध्यापक-५५,
बदली नाकारलेले
उपाध्यापक-२२८, पदवीधर-३८, मुख्याध्यापक-११३
संवर्ग २ -
उपाध्यापक-५१०, पदवीधर-४३, मुख्याध्यापक-११