राहाता तालुक्यात अवघ्या तीन टक्के खरिपाच्या पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:08+5:302021-06-25T04:16:08+5:30
यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या ...
यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरिपाची पिके जोमात येतील व गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतीत झालेले आर्थिक नुकसान या पिकाच्या उत्पन्नातून काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वेळेवर शेतीची मशागत केली. बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली; परंतु पावसाने दडी मारल्याने वेळेवर पेरणी होत नाही म्हणून पुन्हा डोक्यावर कर्जाचा बोजा वाढेल, ही भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. पर्यायाने शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात शेतीमालाची विक्री करावी लागली. यामुळे राहाता तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. त्यातच यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
राहाता तालुक्यात शेतीला पूरक समजला जाणारा दूध व्यवसायही अडचणीत आहे. ३२ रुपये लिटरप्रमाणे विक्री होत असलेले दूध १७ ते २० रुपये प्रतिलिटर याप्रमाणे शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे शेतीमालाबरोबरच दूध व्यवसाय अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते पूर्णतः बिघडलेली आहेत.
यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल व खरिपाची पेरणी वेळेत होऊन सोयाबीन मका व फळबागेपासून चांगले उत्पन्न मिळून कोरोनामुळे शेतीमालाची झालेली आर्थिक हानी कमी होण्यास मदत होईल, ही अपेक्षा बळीराजाला होती; परंतु मृग नक्षत्र संपून २१ जूनपासून सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश झाला तरी वरुणराजाची कृपा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
.......................
मागील वर्षी २२ जूनअखेर राहाता तालुक्यात ५० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या; परंतु यावर्षी २१ जूनपर्यंत अवघ्या ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपाची पेरणी ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यावरच करावी, असे राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले आहे.
......................................
राहाता तालुक्यातील गणेश परिसरात शेती सिंचनासाठी दारणा, गंगापूर धरणांतून पाण्याचे आवर्तन मिळते, तर प्रवरा परिसरात भंडारदरा धरणातून पाण्याचे आवर्तन मिळते; परंतु धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने धरणात पाणीसाठा पुरेसा नसून, वेळेत पाऊस झाला नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी पाणी आरक्षण होऊ शकते.
............................
२४ जूनअखेर राहाता तालुक्यात पडलेला पाऊस
राहाता-२५ मि.मी., शिर्डी- २२ मि.मी., चितळी २५ मि.मी., रांजणगाव ३४ मि.मी., अशी पावसाची नोंद झाली आहे, तर मागील वर्षी २४ जूनअखेर राहाता १६७ मि.मी., शिर्डी- १२३ मि.मी., चितळी- १४० मि.मी., रांजणगाव- १७३ मि.मी. याप्रमाणे पावसाची नोंद झाली होती.