कोरोना लसीकरणासाठी केवळ ५० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:39+5:302021-02-24T04:22:39+5:30

(डमी विषय) अहमदनगर : कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज आहे, लसीचे डोसही मुबलक आहेत. मात्र लस घेणारे ...

Only 50% response to corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी केवळ ५० टक्के प्रतिसाद

कोरोना लसीकरणासाठी केवळ ५० टक्के प्रतिसाद

(डमी विषय)

अहमदनगर : कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज आहे, लसीचे डोसही मुबलक आहेत. मात्र लस घेणारे याकडे दुर्लक्ष करत असल्याने आतापर्यंत लसीकरणाचे केवळ ५० टक्केच उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ६१९ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. मात्र त्यातील ३० हजार ७८६ जणांनीच प्रत्यक्ष लस घेतली आहे. हाच प्रतिसाद राहिला तर अजून महिनाभराचा कालावधी उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लागेल, अशी स्थिती आहे.

कोरोना लसीकरणाची मोहीम नगरसह राज्यात १६ जानेवारीपासून सुरू झाली. प्रथम ३१ हजार व नंतर ३९ हजार असे ७० हजार डोस नगरसाठी प्राप्त झाले. प्रथम आरोग्य अधिकारी-कर्मचारी, नंतर पोलीस, महसूल व पंचायत राज व्यवस्थेतील फ्रंट लाईन कर्मचारी अशा क्रमाने हे लसीकरण जिल्ह्यात सुरू झाले. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सध्या १८ ग्रामीण रूग्णालय, ७ महापालिका रूग्णालय व ३ प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण २८ केंद्रांवर लसीकरण केले जात असून प्रत्येक केंद्रावर दररोज १०० डोसचे उद्दिष्ट आहे. मध्यंतरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवून लसीकरण केंद्रांचा आकडा ४६ पर्यंत नेला होता. परंतु लस घेणारे कर्मचारी कमी प्रतिसाद देत असल्याने दिवसभरात साधारण ५० टक्केच उद्दिष्ट पूर्ण होत आहे.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५ हजार ६१९ जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. गेल्या सव्वा महिन्यात यातील ३० हजार ७८६ जणांनीच प्रत्यक्ष लस घेतली असून अजून २४ हजार ८३३ जणांचे लसीकरण बाकी आहे. लसीकरणाचे हे प्रमाण ५५ टक्के आहे.

------------

लसीकरणासाठी एकूण नोंदणी - ५५६१९

आतापर्यंत झालेले लसीकरण - ३०७८६

सध्या रोजचे उद्दिष्ट - २४४०

प्रत्यक्षात प्रतिसाद - ५० ते ५५ टक्के

----------

केंद्रनिहाय लसीकरण उद्दिष्ट जिल्हा रूग्णालय -१००

पाथर्डी - १००

कर्जत - १००

शेवगाव - १००

श्रीरामपूर - १००

राहाता - १००

संगमनेर -१००

अकोले - १००

कोपरगाव -१००

नेवासा - १००

जामखेड - १००

पारनेर - १००

श्रीगोंदा - १००

राहुरी - १००

विखे पाटील हाॅस्पिटल - २००

तोफखाना (मनपा) - १००

जिजामाता - ५०

नागापूर - १००

केडगाव - १००

मुकुंदनगर - ५०

महात्मा फुले - ५०

सिव्हील - ५०

-----------

एकूण - २४४०

----------------

या कारणामुळे प्रतिसाद कमी

कोरोना लसीकरणासाठी प्रथम कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर संबंधिताला कोणत्या केंद्रावर कधी लस दिली जाईल, याचा मेसेज मोबाईलवर येतो. परंतु संबंधित कर्मचारी त्या तारखेला लसीकरणासाठी येत नाहीत. परिणामी उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नाही.

-----------

कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज आहे. मूबलक डोसही उपलब्ध आहेत. ज्यांनी नोंदणी केली त्यांनी वेळेवर लसीकरण करून घ्यावे. काही कारणास्तव ठरलेल्या दिवशी लसीकरण झाले नाही, तर दुसर्या दिवशीही संबंधिताला लस देण्यात येते. उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

-----------

दहा दिवसात वाढले ११०० रूग्ण

गेल्या दहा दिवसांत जिल्हाभरात ११०० रूग्णांची भर पडली आहे. पूर्वी हे प्रमाण कमी होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Web Title: Only 50% response to corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.