मनपात नुसत्याच बैठका, प्रकल्प कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:10+5:302021-08-23T04:24:10+5:30
अहमदनगर : महापालिकेत शहरातील विकास प्रकल्पांवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. परंतु, महापालिकेची अर्थिक व ढेपाळलेले प्रशासन, यामुळे या ...
अहमदनगर : महापालिकेत शहरातील विकास प्रकल्पांवर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. परंतु, महापालिकेची अर्थिक व ढेपाळलेले प्रशासन, यामुळे या बैठकांतून फारसे काही निष्पन्न होत नसल्याने महत्त्वाचे प्रकल्प भुईलाच रेंगळले आहेत.
स्मार्ट एलईडी प्रकल्प, भुयारी गटार योजना, अमृत पाणी योजना, फेज-२ पाणी योजना, ऑक्सिजन प्रकल्प, बाह्ययंत्रणेमार्फत कर्मचारी भरती, पाच हजार वृक्षांची लागवड, मध्यवर्ती शहरातील मंजूर रस्त्यांची कामे, पंतप्रधान आवास योजना, घनकचरा प्रकल्प, सावेडी नाट्यगृह, कुष्ठधाम मॉडेल रोड आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे. याशिवाय महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट असल्याने स्व:निधीतील कामे घेण्यास ठेकेदार तयार होत नाहीत. शासनाकडून मंजूर झालेल्यांना निधी आहे. पण, हे प्रकल्पही रेंगाळले आहेत. भुयारी गटार योजना अर्धवट असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. भुयारी गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते ठेकेदाराने बुजविले नाहीत. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तसेच फेज-२ पाणी योजना रखडलेली आहे. या योजनेला गती देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली आहे. परंतु, रखडलेली पाणी योजना पाहता हे काम पूर्ण होईल, असे वाटत नाही.
....
स्मार्ट एलईडी, वृक्षारोपणही लांबणीवर
महापालिकेने स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. मात्र हा प्रकल्पही अडकला आहे. तसेच शहरात पाच हजार वृक्षांची लागवड करण्याची घोषणा पालिकेने केली आहे. मात्र हा प्रकल्पही रखडला असून, रस्त्यांत पडलेले खड्डे बुजविण्याचे कामही थांबले आहे. ठेकेदार मिळत नसल्यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम थांबले असून, नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करवा लागत आहे.