मेडिकल बोर्डातील केवळ एकच डॉक्टर बनवतो दिव्यांगाचा दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 08:40 AM2024-09-14T08:40:03+5:302024-09-14T08:40:37+5:30
तीन सदस्यीय बोर्डातील इतर दोन सदस्य तपासणीच करत नाहीत
सुधीर लंके
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र देताना केवळ संबंधित दिव्यांग प्रकारातील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर लगेचच रुग्णालयातील लिपिक प्रमाणपत्र बनवतात. तीनसदस्यीय मेडिकल बोर्डातील इतर दोन सदस्य दिव्यांग व्यक्तीची तपासणीच करत नाहीत व केसपेपरदेखील पाहत नाहीत, हा गंभीर मुद्दा नगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या तपासणीत समोर आला आहे.
जिल्हा रुग्णालयात तपासणी न होताच पाथर्डी तालुक्यातील चार तरुणांना ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याचे प्रकरण जिल्ह्यात उघडकीस आले. यासंदर्भात नगर जिल्हा रुग्णालयात तीनसदस्यीय समितीने चौकशी केली. या समितीचा अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. चौकशी समितीने नाक, कान, घसा विभागातील तज्ज्ञ डॉ. वैजनाथ गुरवले व डॉ. श्रीकांत पाठक, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदीप कोकरे, डाॅ. प्रशांत तांदळे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. साजीद तांबोळी, संतोष चौधरी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अशोक कराळे आदींचे जबाब घेतले.
या सर्व डॉक्टरांनी प्रमाणपत्राची प्रक्रिया जबाबात कथन केली. त्यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तीची आम्ही तपासणी करतो. त्यानंतर केसपेपरवर तशा नोंदी करून आम्ही ही कागदपत्रे कर्मचाऱ्यांकडे सोपवतो. पुढे कर्मचारी प्रमाणपत्र बनवतात. वरील चौघे कधीही तपासणीसाठी आमच्यासमोर आलेले नाहीत. वास्तविकत: दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी तीनसदस्यीय मेडिकल बोर्ड असते. या बोर्डात संबंधित विषयतज्ज्ञासह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा शल्यचिकित्सकही असतात. मात्र, उर्वरित दोन अधिकारी सदर दिव्यांग व्यक्तीची तपासणी करत नाहीत व केसपेपरदेखील पाहत नाहीत, असे विषयतज्ज्ञ डॉक्टरांच्या जबाबातूनच समोर आले आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपवर पासवर्ड होतो शेअर
जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठीचा शासनाच्या पोर्टलचा युजर आयडी व पासवर्ड शेअर केला जातो, ही धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे हा आयडी व पासवर्ड गोपनीय कसा राहणार? असाही प्रश्न आहे