शिर्डीतून सेनेच्या वाकचौरे यांनाच उमेदवारी; विनायक राऊतांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर दिले संकेत
By शिवाजी पवार | Published: March 15, 2024 02:21 PM2024-03-15T14:21:03+5:302024-03-15T14:21:28+5:30
महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळसुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले. वाकचौरे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील व विजयी होतील असे ते म्हणाले.
शिर्डीतील उमेदवारीचा सस्पेन्स त्यामुळे उठला आहे. वाकचौरे यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा त्यामुळे होणे बाकी आहे.
शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळी भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे सचिन बडदे, लखन भगत, संजय छल्लारे, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे उपस्थित होते.
महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळसुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती. मात्र खासदार राऊत यांनी ही चर्चा थांबवली आहे. ते शिवसेनेचे सचिव असून वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने इतर सर्व चर्चा आता संपुष्टात आल्या आहेत.
राऊत म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोक विजय करतील. वाकचौरे हे लोकसंपर्क असणारे उमेदवार आहेत. त्यांनी श्रद्धा व सबुरी जपली आहे. फोडाफोडीचे राजकारण लोकांना नको आहे. शिवसेनेत पंतप्रधानपदासाठी कोणीही दावेदार नाही. महाआघाडीचे नेते व राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे इंडिया आघाडीकडून दावेदार आहेत. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास सेनेला मंत्रिपद मिळतील. त्याचा आम्हाला निश्चित अभिमान राहील.