शिकल्या सवरल्यांचाच संसार टिकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 06:28 PM2019-03-30T18:28:33+5:302019-03-30T18:29:04+5:30
शिकले तितके हुकले’ या ग्रामीण भागातील म्हणीचा प्रत्यय येथील दिलासा सेलला वर्षभरात आला आहे़ २०१८ या वर्षात दिलासा सेलकडे पती-पत्नींमधील वादाच्या एकूण १५२३ तक्रारी दाखल झाल्या आहेत़
अरुण वाघमोडे
अहमदनगर : ‘शिकले तितके हुकले’ या ग्रामीण भागातील म्हणीचा प्रत्यय येथील दिलासा सेलला वर्षभरात आला आहे़ २०१८ या वर्षात दिलासा सेलकडे पती-पत्नींमधील वादाच्या एकूण १५२३ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ यातील १४१० जोडपे शिक्षित, सुशिक्षित ते उच्चशिक्षित आहेत़ विशेष म्हणजे नवविवाहित आणि ‘वेलसेट’ असलेल्या जोडप्यांमध्येच सर्वाधिक जास्त वाद होत असल्याचे या तक्रारींमधून समोर आले आहे़
संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली कायदेशीर मदत मिळावी, या उद्देशाने तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून १५ आॅगस्ट २०१७ रोजी येथील नगर-मनमाड रोडवर दिलासा सेल (वन स्टॉप सेंटर) स्थापन करण्यात आला आहे़
२०१७ ते १८ या एक वर्षाच्या कालावधीत आपसातील वाद मिटविण्यासाठी १५२३ दाम्पत्यांनी दिलासा सेलकडे धाव घेत तक्रार दाखल केली़ यात २५५ पुरुषांनी तर १२६८ महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ यात अशिक्षित असलेल्यांच्या अवघ्या ५१ तर पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असलेल्यांच्या ६२ तक्रारी आहेत़
उर्वरित १४१० तक्रारींमधील पती अथवा पत्नीचे शिक्षण बारावी ते उच्चपदवीधारक असे आहे़ या सुशिक्षित तक्रारदारांमध्ये बहुतांशी जण मोठ्या हुद्यांवर सरकारी अथवा खासगी क्षेत्रात नोकरी करत आहेत तर काहींचा स्वत:चा मोठा व्यवसाय असून, ते श्रीमंत घरातील आहेत़