कांबळेंचा निर्णय अंतिम; विरोध करणा-यांना वाट मोकळी : राजेंद्र झावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:53 PM2019-09-03T12:53:35+5:302019-09-03T12:54:05+5:30

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी स्पष्ट केले

Open to all who oppose: Rajendra zavare | कांबळेंचा निर्णय अंतिम; विरोध करणा-यांना वाट मोकळी : राजेंद्र झावरे

कांबळेंचा निर्णय अंतिम; विरोध करणा-यांना वाट मोकळी : राजेंद्र झावरे

श्रीरामपूर : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सर्वत्र पक्ष प्रवेशाचे धोरण राबविले जात आहे. जे पदाधिकारी कांबळे यांच्या उमेदवारीवरून राजीनामे देण्याची भाषा करत आहेत त्यांना रस्ता मोकळा आहे, असेही झावरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
माजी आमदार कांबळे यांचा शिवसेनेतील प्रवेश व त्यांच्या उमेदवारीवरून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात वाद उफाळून आला आहे. सोमवारी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी देवकर यांनी कांबळेंना उमेदवारी दिल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. या सर्व घडामोडींमागे खासदार लोखंडे यांचीही साथ असल्याचे बोलले जात आहे.
देवकर यांनी एवढ्यावरच न थांबता संघटनेला विश्वासात न घेता कांबळे यांना मातोश्रीवर घेऊन जाणा-या जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शहर प्रमुख सचिन बडधे यांच्यावरही तोफ डागली होती. या दोघांवर कारवाईची मागणीही केली. दहा हजार सह्या घेऊन गुरुवारी कांबळे यांच्या पक्ष प्रवेशाच्या दिवशीच निवेदन देण्याचे जाहीर केले.
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख झावरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. झावरे यांच्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासे मतदारसंघाची जबाबदारी आहे.
झावरे म्हणाले, कांबळे यांनी मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसचा राजीनामा दिला त्या दिवशी मातोश्रीवरून आपल्याला संपर्क करण्यात आला होता. मात्र फोन बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. कांबळे यांना पक्षात घेण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा आहे. तो आम्हाला मानावाच लागेल. राज्य पातळीवरील पक्ष धोरणाचा हा भाग आहे.
जे कोणी पदाधिकारी राजीनामे देण्याची भाषा करत आहेत त्यामुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही. ते वेगळी वाट धरू शकतात. पक्षात आजवर अनेक लोक आले व बाहेर पडले. त्याने काहीही नुकसान झाले नाही. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचाच शब्द अंतिम असतो व तो सैैनिकांना मान्य असतो, असेही झावरे म्हणाले.

 

Web Title: Open to all who oppose: Rajendra zavare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.