विरोधकांनी मंदिरांपेक्षा शाळेसाठी आंदोलन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:56+5:302021-09-03T04:21:56+5:30
श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टीचे नेते बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करीत आहेत. पण मंदिरांपेक्षा त्यांनी ...
श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टीचे नेते बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करीत आहेत. पण मंदिरांपेक्षा त्यांनी शाळा उघडण्यासाठी आंदोलन केले तर या आंदोलनात आम्ही पुढे राहू. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्यांनी आंदोलन करावे, असा टोला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी मारला.
भोसले म्हणाले, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. परंतु आज राज्यामध्ये कोणत्या गोष्टीवर आंदोलन करावं, असा प्रश्न विरोधकांसमोर आहे. सरकारकडून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले तर त्याकडे लक्ष वेधणे अथवा आंदोलन करणे विरोधी पक्षाचे काम आहे. विद्यार्थ्यांना कोविडची लस देऊन शाळा सुरु करणे अतिशय गरजेचे झाले आहे. शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. याकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, ही वास्तवता आहे. मंदिरे सुरु झाली पाहिजेत. पण शाळा बंद राहिल्यामुळे पिढी बरबाद होण्याचा धोका आहे, हे लक्षात घेण्यात येण्याची गरज आहे. आध्यात्मिक प्रश्नापेक्षा शालेय ज्ञान आणि शेतीमालाचे पडलेले भाव याकडे भाजपाने विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.