जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध : अकोलेत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:12 PM2018-10-28T12:12:10+5:302018-10-28T12:12:19+5:30
तालुक्यात आधी दुष्काळ जाहीर करा, मग जायकवाडीला पाणी नेण्याची चर्चा करू.
अकोले : तालुक्यात आधी दुष्काळ जाहीर करा, मग जायकवाडीला पाणी नेण्याची चर्चा करू, अशी भूमिका घेत सर्वपक्षीय कृती समितीने पुकारलेल्या ‘अकोले बंद’ला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शनिवारी दिवसभर कडकडीत बंद पाळला. जायकवाडीला निळवंडेतून पाणी सोडण्याची ‘दवंडी’ ऐकायला येताच तालुक्यातील हजारो शेतकरी प्रवरा नदीपात्रावरील ‘अगस्ती सेतू’ पुलावर बसून सत्याग्रह आंदोलन छेडतील, असा इशारा दिला.
तहसीलदारांच्या दालनात अधिका-यांसमवेत आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, मधुकर नवले, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. रामनाथ चौधरी, कैलास वाकचौरे, गिरजाजी जाधव, कॉ. क ारभारी उगले, शांताराम वाळुंज, मिनानाथ पांडे, अशोक देशमुख, सोन्याबापू वाकचौरे, अशोक आरोटे, विजय वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, महेश नवले, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, गुलाब शेवाळे, विलास आरोटे, तहसीलदार मुकेश कांबळे व जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी चर्चा केली.
पावसाची आकडेवारी व जलसाठ्यांमुळे ‘दुष्काळ’ घोषित झाला नाही, मग हे पाणी अन्य भागासाठी वाहून नेण्याचा जलसंपदाला अधिकार काय? भंडारदार धरणाचे पाणी वाटप झाले. त्या पाण्यावर तालुक्यातील लाभ व बुडीतक्षेत्राचा अधिकार असून पाणलोटातील आदिवासींच्या हक्काच्या पाण्यावर सरकारने गदा आणू नये? अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
अकोले तालुक्यात दुष्काळी परिस्थिती व शहरात कडकडीत बंद असताना पालकमंत्री संगमनेरला आले पण २२ किलोमीटर पुढे अकोलेला आले नाही. हा मंत्र्यांचा उद्दामपणा आहे. भाजप मंत्र्यांची मुजोरी कमी करायला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची वज्रमूठ गरजेची आहे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून जायकवाडीला पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास हजारो शेतकरी नदीपात्रात बसून जनांदोलन छेडू.- डॉ. अजित नवले