विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:51+5:302021-07-07T04:25:51+5:30
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद मार्फत शहरात होणाऱ्या विकास कामांना आमचा कधीच विरोध नव्हता आणि यापुढेही राहणार नाही. मात्र, ...
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद मार्फत शहरात होणाऱ्या विकास कामांना आमचा कधीच विरोध नव्हता आणि यापुढेही राहणार नाही. मात्र, विकास कामाच्या नावाखाली जर भ्रष्टाचार होणार असेल तर ते आम्ही मुळीच होऊ देणार नाही, अशी भूमिका कोपरगाव नगरपरिषदेच्या भाजपा-शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे.
कोपरगाव शहरातील विविध २८ विकास कामांना स्थगिती मिळावी, यासाठी औरंगाबाद खंडपीठात भाजपा - शिवसेनेच्या नगरसेवकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपा-शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोमवारी (दि.५) भाजपा संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या.
उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणाले, आमचा २८ कामांना बिलकुल विरोध नाही. त्यातील ६-७ कामांना विरोध आहे. कारण या कामातून मोठा भ्रष्टाचार होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही बहुमताने नामंजूर केलेल्या कामासंदर्भातील १६ फेब्रुवारीचा ठराव तहकूब केला होता. मात्र, त्यात ही कामे करावी, असा कोणताही उल्लेख नव्हता. त्यानंतरही सदरची कामे चार महिन्यानंतर कामे सुरु करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. भाजपा नेते पराग संधान म्हणाले, आमचा फक्त ६ कामांना विरोध आहे. संपूर्ण २८ कामे सुरु करण्याचे आदेश न देता फक्त ११ कामाचे आदेश दिले आहेत. ही कामे थांबावी म्हणून आम्ही कोर्टात गेलो, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक योगेश बागुल, कैलास जाधव, रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, आर. डी. सोनावणे, विनोद राक्षे यांनीही आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. या पत्रकार परिषद प्रसंगी विजय आढाव, नगरसेवक विजय वाजे, जनार्दन कदम, शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, अतुल काले, आरपीआयचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक आदी उपस्थित होते.
.......
मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार
बहुमताने कामे नामंजूर केलेली असतानाही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी १ जून रोजी काही कामे सुरु करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच आठ दिवसातच ३४ नवीन बांधकामांना मंजुरी देत ५२ कामांना पूर्णत्वाचे दाखले दिले आहेत. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झालेला असून येत्या दोन दिवसात मुख्याधिकारी सरोदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे भाजपा नेते पराग संधान यांनी सांगितले.