लालपरी बसेस भाडेतत्त्वावर घेण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:19+5:302021-06-30T04:14:19+5:30
राज्य परिवहन महामंडळाने लालपरी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचे धोरण नुकतेच जाहीर केले होते. मागील सरकारने शिवशाही बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. ...
राज्य परिवहन महामंडळाने लालपरी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचे धोरण नुकतेच जाहीर केले होते. मागील सरकारने शिवशाही बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. त्याचा परिवहन महामंडळाला फटका बसला. प्रशासन हतबल झाले होते. मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. फायदा मात्र एजन्सीला झाला. शिवशाही बसेसमधून परिवहन महामंडळाला किती उत्पन्न मिळाले व नफा-तोटा झाला हे महामंडळाने जाहीर करावे, अशी मागणी श्रीगोड यांनी पत्रकातून केली आहे.
लालपरी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचे धोरण कोणाच्या हितासाठी आहे? प्रवासी महासंघाने सातत्याने लक्ष वेधूनही आघाडी सरकार त्याबद्दल निर्णय घेत असेल तर आश्चर्य आहे, अशी टीका महासंघाचे सचिव गुरुनाथ बहिरट (पंढरपूर) यांनी केले आहे.
लालपरीमुळे महामंडळाला पुन्हा तोटा झाल्यास त्याचा गंभीर आर्थिक परिणाम होणार आहे. प्रवासी जनता मात्र भाडेवाढीमुळे होरपळून जाईल व एस.टी.प्रवासाऐवजी अवैध वाहतुकीकडे कल वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे.
एसटीचे आर्थिक उत्पन्न कसे वाढविता येईल, कुठलीही गुंतवणूक न करता एसटीला आर्थिक सुस्थितीत कसे आणता येईल या इच्छाशक्तीचा अभाव आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना सरकारचे प्रोत्साहन मिळत नाही, असा आरोप प्रदेशाध्यक्ष श्रीगोड यांनी केला आहे.