‘तनपुरे’चे खासगीकरण करण्याचा विरोधकांचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:36+5:302021-03-29T04:15:36+5:30
राहुरी : सहकारी तत्त्वावर चालविला जाणारा तनपुरे कारखाना बंद पाडून त्याचे खाजगीकरण करण्याचा विरोधकांचा डाव आहे. त्यासाठी येत्या पंचवार्षिक ...
राहुरी : सहकारी तत्त्वावर चालविला जाणारा तनपुरे कारखाना बंद पाडून त्याचे खाजगीकरण करण्याचा विरोधकांचा डाव आहे. त्यासाठी येत्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधक निवडणूक लढविणार आहेत. मात्र, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा हा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे अभिवचन खासदार डॉ. सुजय विखे यांनी कारखान्याच्या सभासदांना दिले.
डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे होते. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक खासदार विखे बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढुस, शामराव निमसे, बाळकृष्ण कोळसे, केशवराव कोळसे, महेश पाटील, मच्छिंद्र तांबे, अशोक खुरुद, मधुकर पवार, उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, भारत तारडे, शिवाजी गाडे, सुरसिंग पवार, विजयराव डौले, नंदकुमार डोळस, अर्जुन बाचकर, सुभाष वराळे, हिराबाई चौधरी, पार्वतीबाई तारडे, कार्यकारी संचालक बी.एन. सरोदे, अंबादास पारखे उपस्थित होते.
तनपुरे कारखान्याचे एप्रिल अखेरपर्यंत ऊस गाळप सुरू राहणार आहे. ज्यांचे राहुरी कारखान्याला उसाचे टिपरू जात नाही त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार नाही. यंदाच्या गाळपासाठी अनेक अडचणी आल्या; परंतु सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतल्यामुळे २ लाख टन ऊस गाळप आजअखेर पूर्ण झाले आहे. नर्सिंग होम, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी कधी पाय ठेवला नाही. सभासद, कामगारांचा आत्मा असलेला राहुरी कारखाना सुरळीत चालावा हीच आमची भूमिका आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी कारखान्यासाठी मोठी मदत केली असल्याचाही उल्लेख खासदार विखे यांनी केला.