महामार्ग महापालिकेकडे घेण्यास विरोध
By Admin | Published: March 16, 2016 11:49 PM2016-03-16T23:49:19+5:302016-03-16T23:57:33+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या ताब्यात (अवर्गीकृत) घेण्याच्या विषयाला सभागृहातून विरोध दर्शविण्यात आल्यानंतर तो विषय रद्द करण्याचा निर्णय महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांनी घेतला.
अहमदनगर : शहरातून जाणारे राष्ट्रीय/राज्यमार्ग महापालिकेच्या ताब्यात (अवर्गीकृत) घेण्याच्या विषयाला सभागृहातून विरोध दर्शविण्यात आल्यानंतर तो विषय रद्द करण्याचा निर्णय महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांनी घेतला. गंगा उद्यानाशेजारी मनोरंजन पार्क अथवा वॉटर पार्क करण्याच्या विषयाला सभेने मंजुरी दिली. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावर झालेली किरकोळ वादावादी वगळता सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
महापालिकेची महासभा बुधवारी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयाला सत्तापक्षाचे नगरसेवक दीप चव्हाण व विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला. सभागृहात झालेला ठराव प्रत्यक्षात कागदावर उतरला जात नाही. त्याला ‘तसेच’ म्हणून आणखी जोड दिला जातो असे सांगत भाजप नगरसेवक अॅड. अभय आगरकर यांनी सभागृहात पुरावेच सादर केले. सर्जेपुरातील रंगभवनातील गाळे हस्तांतर व नूतनीकरणावर दीप चव्हाण यांनी ठरावातील विसंगती निदर्शनास आणून दिली. या गाळ्यांसदर्भात सत्ता पक्षाचे दीप चव्हाण व अरीफ शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
शहरातून जाणारे मनमाड, औरंगाबाद, पुणे, दौंड, कल्याण, विशाखापट्टणम, भूषणनगर लिंक रस्ता हे राष्ट्रीय/राज्यमार्ग महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा विषय सभेसमोर होता. विषय उपस्थित होताच सभागृह नेते कुमार वाकळे यांनी हे रस्ते महापालिकेच्या ताब्यात आले तर त्यांची देखभाल दुरूस्तीचा खर्च मनपाकडून होणार नाही. शिवाय अतिक्रमणे वाढून पार्किंग व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल असे सांगत विषयाला विरोध दर्शविला. सभागृह नेत्यांनीच विरोध दर्शविल्यानंतर विरोधकांची हवाच निघून गेली. भाजपच्या मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, दीप चव्हाण, किशोर डागवाले, अभर आगरकर यांनी त्याला विरोध दर्शविला. आगरकर यांनी तर भाजप-सेनेचा या विषयाला विरोध असल्याचे जाहीर केले. केंद्र शासनाने या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. हे रस्ते महापालिकेच्या ताब्यात आले तर हा निधी मिळण्यास अडचण होईल असे सुवेंद्र गांधी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहाचा कल पाहता तो विषय कळमकर यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
गंगा उद्यानाशेजारी असलेल्या सव्वादोन एकर जागेवर बांधा, वापरा व हस्तांतर करा तत्वावर मनोरंजन पार्क किंवा वॉटर पार्क करण्याचा विषय महासभेत मंजूर करण्यात आला. या जागेवर स्वीमिंग टॅँक केला तर त्यासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी आणून देऊ असे आश्वासन आगरकर यांनी सभागृहात दिले. मात्र त्या जागेवर न करता त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कळमकर यांनी दिले. (प्रतिनिधी)