विखे यांना भाजपामध्ये घेण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 12:14 PM2019-03-10T12:14:41+5:302019-03-10T12:25:56+5:30

डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे.

Opposition to take Sujay Vikhe into BJP | विखे यांना भाजपामध्ये घेण्यास विरोध

विखे यांना भाजपामध्ये घेण्यास विरोध

ठळक मुद्दे डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे.विखे यांची पुन्हा एकदा राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांनी सातत्याने भाजपावर टीका केली आहे.

अहमदनगर - डॉ. सूजय विखे यांना भाजपामध्ये प्रवेश द्यायचा का? याची चाचपणी करण्यासाठीच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शनिवारी नगरला आले होते. मात्र या बैठकीत डॉ. विखे यांना भाजपामध्ये घेण्यास स्थानिक आमदारांनी विरोध केला आहे. उघडपणे बोलायला कोणी तयार नसले तरी खासगीत सर्वच आमदारांनी ही  बाब मान्य केली आहे.त्यामुळे विखे यांची पुन्हा एकदा राजकीय कोंडी निर्माण झाली आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांनी ८ मार्च रोजी मुंबईत भेट घेतली. यामध्ये त्यांनी भाजपातून अहमदनगर लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र सदर भेट बिगर राजकीय होती, विखे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रश्न घेऊन ते आल्याचे महाजन व विखे यांनी माध्यमांना सांगितले. या पार्श्वभूमीवर विखे यांना भाजपात घेण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी मंत्री महाजन हे शनिवारी नगरमध्ये होते. त्यांनी जिल्ह्यातील भाजप आमदारांशी चर्चा केली. यावेळी सर्वच आमदारांनी विखे यांना भाजपात घेण्यास विरोध दर्शविला. राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे यांनी सातत्याने भाजपावर टीका केली आहे. भाजपाचे खा. दिलीप गांधी यांच्यावरही ‘टक्केवारीचा खासदार’ म्हणून टीका केली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावरही त्यांची टीका सुरू असते. विखे भाजपमध्ये आले तर ते पक्ष संघटना वाढविणार नाही, अशीही बाजू आमदारांनी महाजन यांच्यापुढे मांडली. हे सगळे मुद्दे घेऊन महाजन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे सध्या तरी विखे यांच्या भाजपा प्रवेशावर टांगती तलवार आहे.

एकाच हेलिकॉप्टरने रवाना

विखे यांना पक्षात घेण्यास विरोध झाला असला तरी गिरीश महाजन आणि डॉ. सुजय विखे हे एकाच हेलिकॉप्टरमधून शनिवारी जळगावकडे रवाना झाले. दोघेही एकाच हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनीही पाहिले.भाजपात आल्यास शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाचीही ऑफर महाजन  यांनी डॉ. विखे यांना दिल्याची चर्चा आहे. मात्र विखे यांनी अहमदनगर लोकसभेच्या उमेदवारीचा हट्ट कायम ठेवला आहे. विखे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार आहे. लोकसभेची उमेदवारी ही दिल्लीतून निश्चित होते, असे महाजन यांनी माध्यमांना सांगितले. फक्त ते दिल्लीकडे काय शिफारस करणार? यावर विखे यांच्या भाजपा प्रवेशाचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: Opposition to take Sujay Vikhe into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.