जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; श्रीरामपुरात लाक्षणिक उपोषण
By शिवाजी पवार | Published: October 17, 2023 02:41 PM2023-10-17T14:41:20+5:302023-10-17T14:41:58+5:30
दुष्काळी स्थितीमुळे वाद
लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
भंडारदरा धरणाचे लाभक्षेत्र असलेल्या संगमनेर, राहता, श्रीरामपूर व नेवासे तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातच जायकवाडी धरणात समन्यायी पाणी कायद्यानुसार पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर अखेर जायकवाडी ६५ टक्के पाणीसाठा झाला नाही तर नगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडले जाते. या कायद्याला नगर जिल्ह्यात विरोध होतो आहे. येथील भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या वडाळा उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी १०० -१२५ शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
वडाळा उपविभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना समन्यायी कायदा रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले. मंगळवारी (दि.१७) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालयात होणाऱ्या पाणी नियोजन बैठकीत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे म्हणणे तेथील कार्यकारी संचालकांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे.