तालुक्याबाहेरील नागरिकांच्या लसीकरणास पाथर्डीत विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:10+5:302021-05-10T04:20:10+5:30
पाथर्डी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून थेट मुंबई, पुणे, नाशिक येथून नागरिक पाथर्डी शहरात येत आहेत. त्यामुळे ...
पाथर्डी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून थेट मुंबई, पुणे, नाशिक येथून नागरिक पाथर्डी शहरात येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील नागरिकांना लस घेऊ देणार नाही, असा पवित्रा घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील लसीकरण केंद्रासमोर रविवारी सकाळी १० वाजता एक तास ठिय्या आंदोलन केले.
पाथर्डी तालुक्यात कोरोनामुळे शेकडो नागरिकांचे मृत्यू झाले. हजारो नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. वैद्यकीय उपचार यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. शहर व ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात उपलब्धतेनुसार ऑनलाईन नोंदणीनंतर लसीकरण सुरू आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, यंत्रणा व इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने स्थानिक नोंदणी होण्यात अडचणी होत आहेत. मात्र, याउलट शहरी भागात ब्रॉडबँड सुविधा असल्याने तत्काळ नोंदणी होत असून पाथर्डी तालुक्यातील लसीकरण केंद्रावर पुणे, मुंबई, नाशिक तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील नागरिक नोंदणी करून लस घेत आहेत. यामुळे मात्र स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे, अमोल गर्जे यांनी याबाबत तालुक्याच्या वाट्याला आलेली लस ही तालुक्यातील जनतेलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी करत सकाळी १० पासून एक तास ठिय्या आंदोलन केले.
यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी वस्तुस्थिती वरिष्ठांना कळवून स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले; परंतु यानंतर तालुक्याबाहेरील व्यक्तींना लसीकरणासाठी केंद्रावर फिरकू देणार नाही, असा इशारा मुकुंद गर्जे यांनी दिला.
---
०९पाथर्डी आंदोलन
पाथर्डी तालुक्यातील नागरिकांना प्राधान्याने कोविड प्रतिबंधक लसीकरण करावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे, अमोल गर्जे यांनी लसीकरण केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले.