मुळा धरणातून बीडला पाणी देण्यास विरोध; प्रसाद शुगर याचिका करणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 04:18 PM2019-10-14T16:18:00+5:302019-10-14T16:19:11+5:30
मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.
अहमदनगर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.
राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेतकºयांना मुळा धरण हे संजीवनी देणारे ठरलेले आहे. मात्र, समन्यायी पाणी वाटप कायद्याव्दारे मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला द्यावे लागले आहे. एकीकडे मराठवाड्यातील राजकीय नेते धरणावर बॉम्ब टाकण्याची भाषा करीत असताना लोकप्रतिनिधींनी रातोरात या कायद्यावर सह्या केल्या. एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारा राहुरी तालुका आज वाळवंट होऊ पहात आहे. शाश्वत पाणी नसल्यामुळे येथील ऊस शेती कमी होवून साखर कारखानदारीही संकटात सापडली आहे.
मुळा धरणातून बीडला पाणी नेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून मुळा धरण ते बीड या प्रस्तावित वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. हा प्रस्ताव मुंबई येथील संबधित विभागाकडे विचाराधीन असल्याचीही माहिती मिळत आहे. याबाबत कुणकुण लागताच राहुरीतील शेतकरी संतापाने पेटून उठला आहे. मुळा धरणात जमिनी आमच्या, धरणासाठी त्याग आमचा आणि पाणी मराठवाडा अन् बीडला द्यायचे हा कोणता न्याय आहे. याप्रश्नी शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतक-यांच्या भावना लक्षात घेता प्रसाद शुगर कारखान्यानेही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून बीडला मुळा धरणातून पाणी द्यायचे नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे. असे प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले.