मी कोणत्या पक्षाकडून लढणार याचीच विरोधकांना चिंता : शंकरराव गडाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:49 AM2019-08-24T11:49:35+5:302019-08-24T11:49:56+5:30
मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे.
नेवासा : पाटपाण्याचे नियोजन झाल्यासच तालुक्याला भवितव्य आहे. मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
सोनई-करजगाव योजनेत समावेश नसताना पिण्याच्या पाण्यासाठी आक्रोश करणाऱ्या उस्थळ दुमाला, नारायणवाडी, धनगरवाडीच्या ग्रामस्थांनी स्वखर्चाने या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार गडाख यांचा उस्थळ दुमाला येथे नागरी सत्कार करण्यात आला.
राजकीय पक्षापेक्षा लोकांची कामे मार्गी लावण्याला आपले प्राधान्य आहे. विकास कामे करताना भेदभाव करणे आपल्या रक्तातच नाही. लोकहिताच्या मुद्यावर पक्षीयबंधन आड येऊ देत नसल्याने कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची हा मुद्दा गौण ठरतो, असे स्पष्ट करून गडाख म्हणाले, हातात हात देण्याचे नाटक आपल्याला जमले नाही, मात्र लोकांना जे पाहिजे ते मिळवून देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. जायकवाडी बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चार तासांवर आणल्याबाबत लोकप्रतिनिधी बोलत नसल्याबद्दल गडाख यांनी आश्चर्य व्यक्त केले. पूर्ण क्षमतेने भरलेल्या जायकवाडी धरणातून दहा हजार क्युसेकने पाणी मराठवाड्याला सोडण्यास सुरूवात झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्ते, वीज रोहित्र बसविण्याची जबाबदारी शासन पार पाडत असताना आमदारकीच्या माध्यमातून वेगळे काय केले ते आमदार मुरकुटे यांनी सांगावे, असे आवाहन गडाख यांनी केले.
मी राजकारण, समाजकारण करत असताना कधीही नाटक केले नाही. तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम केले. धरणात पाणी कमी असतानाही तालुक्याला तुमच्या सहकार्याने पाणी मिळवून दिले. विधानसभेत अपयश आले तरी पाण्यासाठी लढलो हे तुम्ही सर्वांनी पाहिले. यापुढेही तालुक्याच्या पाण्यासाठी कुठल्याही पक्षासमोर झुकणार नाही, असे माजी आमदार शंकरराव गडाख म्हणाले.