तहसीलदारांची बदली रद्द करण्यासाठी नेवासा शहरात रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:23 PM2018-08-25T17:23:10+5:302018-08-25T17:23:17+5:30
तहसीलदार उमेश पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी पंचायत समिती समोर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
नेवासा : तहसीलदार उमेश पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी पंचायत समिती समोर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती समोर नेवासा - श्रीरामपूर रस्त्यावर रास्तारोको अर्धा तास सुरू होता.
निवेदनात म्हटले आहे, कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाही तहसीलदार पाटील यांची बदली का करण्यात आली, याची कारणे जनतेसमोर स्पष्ट करावे. तहसीलदार पाटील हे नेवासा येथे कार्यरत असल्यापासून त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. त्याचे भीमा कोरेगाव प्रकरण, मराठा मोर्चे, इतर समाजाचे ही मोर्चे निघाले. या संदर्भात महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटले. तालुका अतिसंवेदनशील असतानाही केवळ तहसीलदार पाटील यांनी योग्यप्रकारे हाताळून तालुक्यात कुठलीही अनुचित घटना होऊ दिली नाही. स्वत: च्या जीवावर उदार होऊन तालुक्यात चालू असलेल्या बेकायदेशीर वाळू माफियांच्या मुसक्या आवळून शासनाला नेवासा तालुक्यातून सर्वात जास्त महसूल मिळवून दिला. कार्यालयातील कर्मचा-यांना ही शिस्त लावली. कर्तव्यदक्ष अधिका-याची तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे ही बदली त्वरित रद्द करावी. या मागणीसाठी तालुक्यातील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी आंदोलनाचे प्रमुख संजय सुखधान, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, महेश मापारी, डॉ.करणं घुले, मनोज पारखे, बाळासाहेब कोकणे, भाऊसाहेब वाघ, गफूर बागवान, बाळासाहेब पवार, जावेद इनामदार, जाकीर शेख यांची भाषणे झाली. नायब तहसीलदार नारायण कोरडे व सहायक पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.