विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:51 PM2019-10-07T12:51:37+5:302019-10-07T12:52:10+5:30

अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणा-या विमा कंपनीची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोपरगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहे़ 

Order to confiscate the assets of the insurance company | विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

अहमदनगर : अपघातग्रस्ताला नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणा-या विमा कंपनीची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोपरगाव येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले आहे़ 
न्यायाधीश एऩएऩ श्रीमंगले यांनी हा आदेश दिला असून, या प्रकरणात अर्जदारातर्फे अ‍ॅड़ सुरेश लगड व अ‍ॅड़ अशोक वहाडणे यांनी काम पाहिले़ कोपरगाव तातुक्यातील धोत्रे येथील शेतकरी रमेश छबुराव गवारे (वय ५२) यांचा १५ मार्च २०१५ रोजी बाभळेश्वर परिसरात अपघात झाला होता़ त्यांच्या मोटारसायकलला मॅक्झिमा मिनी व्हॅनने धडक दिल्याने हा अपघात झाला होता़ या अपघातात गवारे हे कायमस्वरुपी अधू झाले़ याप्रकरणी पोलिसांनी तपास करून व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ दरम्यान गवारे यांनी न्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाईसाठी अर्ज केला होता़ यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या व्हॅनची विमा कंपनी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्सने अपघातग्रस्ताला ७ लाख १२ हजार ८५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते़ कंपनीने मात्र हे पैसे न दिल्याने गवारे यांनी अ‍ॅड़ लगड यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली होती़ 
 सदर विमा कंपनीची व्याजासह १० लाख ४ हजार ६५६ रुपयांची   जंगम मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी अर्जदाराच्यावतीने करण्यात आली होती़ यावर न्यायालयाने कंपनीचे मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत़ 

Web Title: Order to confiscate the assets of the insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.