कोपरगाव तालुक्यातील वाळू तस्कर स्थानबद्ध, जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांचे आदेश
By सचिन धर्मापुरीकर | Published: March 30, 2024 03:07 PM2024-03-30T15:07:53+5:302024-03-30T15:08:37+5:30
कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी व सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर योगेश संजय कोळपे (वय ३२) यास ...
कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी व सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर योगेश संजय कोळपे (वय ३२) यास जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशाने स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्यावर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गैर कायद्याची मंडळी जमवुन मारहाण करणे, दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासनाची फसवणूक करुन गौणखनीजाचे उत्खनन करणे, सरकारी नोकरावर हल्ला करणे असे गुन्हे दाखल आहेत.
योगेश संजय कोळपे याने शासकीय वाळु चोरीचे गंभीर स्वरुपाचे व मारहाणीचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. सराईत गुन्हेगार व वाळू तस्कर योगेश कोळपे याचे समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी एमएपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करुन शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी व श्रीरामपुर येथील अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना पाठविला होता.
या प्रस्तावाची पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पडताळणी करुन प्रस्ताव हा शिफारशी सह जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता.
प्रस्तावाची व कागदपत्रांची जिल्हा दंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पडताळणी करुन अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनीक सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी सराईत गुन्हेगार योगेश संजय कोळपे यास स्थानबध्द करणे बाबतचे आदेश काढले. पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.
कठाेर कारवाईचे संकेत
अहमदनगर जिल्ह्यामध्ये आचारसंहितेच्या काळात सराईत गुन्हेगार, वाळु तस्कर तसेच संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळींविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत योगेश कोळपे याच्यावरील कारवाईमुळे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत.