बोगस विद्यार्थी दाखविणा-या शाळांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:27 PM2018-07-31T12:27:58+5:302018-07-31T12:28:01+5:30
राज्यभर गाजणाऱ्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील चार खासगी शाळांचा समावेश असून, या शाळांची चौकशी करून मुख्याध्यापक, संस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सोमवारी सायंकाळी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर : राज्यभर गाजणाऱ्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील चार खासगी शाळांचा समावेश असून, या शाळांची चौकशी करून मुख्याध्यापक, संस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सोमवारी सायंकाळी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सन २०११ मध्ये शिक्षण विभागाने केलेल्या पटपडताळणीत नगर शहरातील अभिनव बालविकास मंदिर, सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, शेवगाव येथील मॉडर्न उर्दू स्कूल आणि राहुरी तालुक्यातील खडकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने बोगस विद्यार्थी संख्या दाखविल्याचे उघड झाले, परंतु, कारवाईबाबत चालढकल सुरू होती. या प्रकरणात न्यायालयाने बडगा उगारल्यानंतर शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी गटशिक्षणाधिका-यांना वरील शाळांची चौकशी करावी़ चौकशीत दोषी आढळल्यास मुख्याध्यापक व संस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले. त्यावेळी शाळांनी कागदोपत्री दाखविलेली विद्यार्थी संख्या, प्रत्यक्षात आढळून आलेले विद्यार्थी, याचा तुलनात्मक अभ्यास करणे, त्याआधारे पोषण आहार, गणवेश, शिक्षक मंजुरी आदींचे अनुदान संस्थेने लाटले का, याची चौकशी केली जाणार आहे.