आयुक्तांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
By Admin | Published: August 13, 2015 10:59 PM2015-08-13T22:59:19+5:302015-08-13T23:10:42+5:30
अहमदनगर: खत निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारावा या हरित लवादाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी लवादासमोर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
अहमदनगर: सहा महिन्याच्या आत कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारावा या हरित लवादाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी लवादासमोर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच महापालिका आयुक्तांनाही लवादाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून १२ आॅक्टोबरला समक्ष उपस्थित आदेश राहण्याचे बजावले आहे.
नगर शहरातील संकलित होणारा कचरा बुरूडगाव रस्त्यावरील कचरा डेपोत साठविला जातो. तेथे साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने पर्यावरण प्रदूषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे बेरड या शेतकऱ्याने केली होती. त्यावर लवादाने सहा महिन्याच्या आत खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्प उभारावा.
महापालिकेने त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे साडेचार कोटी रुपये जमा करावे असे आदेश देत प्रकल्प उभारण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली होती. ५ नोव्हेंबर २०१४ रोजी लवादाने हे आदेश दिले.
मात्र मुदत संपूनही प्रकल्प उभारला नाही म्हणून बेरड यांनी लवादाच्या आदेशाचा अवमान केला याबाबत याचिका दाखल केली. गुरूवारी त्याची सुनावणी लवादाच्या पुणे येथील कार्यालयात झाली. प्रकल्पाच्या स्थितीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर का नाही केले? अशी विचारणा लवादाने केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्राशी सहमत असल्याचे महापालिकेच्यावतीने वकिलाने लवादास सांगितले. मात्र लवादाने महापालिका आयुक्तांना स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगत १२ आॅक्टोबरला समक्ष सुनावणीस उपस्थित रहावे तसे न झाल्यास वॉरंट बजावले जाईल अशी तंबी दिली.
(प्रतिनिधी)