आदिवासी विद्यार्थ्यांनी फुलविली सेंद्रिय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:12+5:302021-01-25T04:21:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात समस्या उद्भवल्या. शाळा काही महिने बंद राहिल्या. मात्र, या परिस्थितीतून नवीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात समस्या उद्भवल्या. शाळा काही महिने बंद राहिल्या. मात्र, या परिस्थितीतून नवीन काही शिकता येईल का? या उद्देशाने येथील महामानव बाबा आमटे संस्थेने प्रयास फार्म अंतर्गत ‘कमवा आणि शिका’ सेंद्रिय पध्दतीने पपईच्या बागेत कोबी, फ्लॉवर, हरभरा ही आंतरपिके घेतली आहेत.
संस्थेतील विद्यार्थ्यांना व सेवकांना सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी शेतीत हिरवी मिरची, शिमला, कोबी, फ्लॉवर, टमाटे, पालक, गाजर, बीट, काकडी, वांगी, कारले, घोसाळे, दोडके, भोपळा या पिकांच्या शेतीत आंतरपीक व ठिबक सिंचनचा वापर केला.
सेंद्रिय शेतीसाठी त्यांना शुभांगी झेंडे, लताताई पवार यांनी विशेष मदत केली. यात विशेषतः गावरान गायीचे गोमूत्र, जीवामृत यांचा विशेष वापर केला जातो. याशिवाय संस्थेच्या आवारात एकूण ५०० फळझाडे लावली आहेत. यात प्रामुख्याने सीताफळ, जांभूळ, चिंच, आंबा, चिकू, बदाम, नारळ, फणस आदी फळझाडे लावली असून झाडांना ठिबक सिंचन केले आहे. झाड विद्यार्थी दत्तक योजनेतून सर्व मुले या झाडांची काळजी घेतात.
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी फुलवलेल्या या सेंद्रिय भाजीपाल्याला विशेष मागणी वाढत आहे. डॉ. अरुण रोडे, सतीश बोरा, प्रा. नारायणराव गवळी, डॉ. एस. पी. लवांडे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
प्रयास या संस्थेमुळे राजश्री वैद्य यांच्या माध्यमातून संस्थेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्यातूनच प्रयास फार्म सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र चालू आहे. या उपक्रमात संस्थेतील अभिषेक काळे, विशाल पवार, शुभम पाटील, जाकीर आतार, आकाश माळी, अर्जुन भोसले, महेश काळे यांच्यासह १५ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत.
....
श्रमाची गोडी
संस्थेला लागणारा भाजीपाला उपलब्ध झाला. शिवाय काही भाजीपाला विकून त्यातून संस्थेने त्यांना कमवा आणि शिका योजनेतून पैसेही देऊ केले. विद्यार्थ्यांना श्रमाची गोडी लागावी आणि यातून त्यांनी आपली प्रगती करावी हा उद्देश असल्याचे या उपक्रमाच्या प्रमुख अश्विनी बारबोले यांनी सांगितले.
....
श्रमदान आणि मार्केटिंग
सध्या हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला स्टॉल लावून भाजीपाला विकत आहेत. व्यावहारिक ज्ञान घेत आहेत. दररोज शेतीत एक तास श्रमदान करून संस्थेची शेती फुलवली आहे.
...
२५श्रीगोंदा सेंद्रीय शेती
...
ओळी-श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे संस्था कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे देत आहे. शेतीत काम करताना विद्यार्थी दिसत आहेत.