जैविक खते शाश्वत शेतीचा मूलभूत घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:55+5:302020-12-26T04:17:55+5:30
कृषी विभागाच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...
कृषी विभागाच्या वतीने निंबोडी (ता. नगर) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्माअंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. दहातोंडे यांनी ‘संत्रा पीक बहर व्यवस्थापन व लागवड’ या विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, ऑरेंज व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अंबादास बेरड, उपसरपंच भीमा बेरड, श्रीकांत जावळे, संजय मेहेत्रे, उमेश डोईफोडे, रमेश लगड यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
डॉ. दहातोंडे पुढे म्हणाले की, जैविक खतांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या प्रतिजैविकांमुळे पिकांची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते व संजीवकांमुळे बियाणांची उगवण शक्ती वाढून पिकांची चांगली वाढ होते. यात जमीन, पाणी व पिकांसाठी अपायकारक रसायने नसतात. ही खते तुलनेत स्वस्त असल्याने उत्पादनखर्चात बचत होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप म्हणाले की, शेतकरी पिकवितो; परंतु विक्री व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाही. नागपूर संत्राबरोबर नगर संत्र्याचे नाव राज्यात झळकायला हवे. कृषी विभागाच्या माध्यमातून गटशेती करावी. जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. तंत्रशुद्ध शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधला पाहिजे.
गहिनीनाथ कापसे यांनी ‘संत्रा पिकावरील बहर व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन केले. नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. संत्रा उत्पादक शेतकरी उमेश लगड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले. आभार उमेश डोईफोडे यांनी मानले.
-------
फोटो - २५कृषी संवाद
आत्माअंतर्गत ‘किसान गोष्टी कार्यक्रम’प्रसंगी निंबोडी येथे अंबादास बेरड यांच्या संत्रा बागेची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दहीगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर दहातोंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, विभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे आदींसह कृषी अधिकारी.