राहुरीत मल्चींगवर सेंद्रीय टरबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:56 PM2018-04-13T12:56:07+5:302018-04-13T14:00:00+5:30
भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
भाऊसाहेब येवले
राहुरी : भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
वसंतराव ठुबे यांनी जमिनीची उभी, आडवी नांगरट केली़ चार ट्रॉली शेणखत टाकले़ निंबोळी खताच्या १० गोण्याचा वापर केला. सहा बाय सव्वा या आकारात टरबुजाची लावणी केली. त्यासाठी शुगर किंग या टरबुजाच्या वाणाची निवड केली. बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळया टकल्या़ त्यावर मल्चींग पसरविण्यात आले. टरबुजाची लागवड केल्यानंतर दही व गोमूत्र ठिबकव्दारे देण्यात आले. मल्चींगवर छिद्र पाडून टरबुजाबरोबरच मिरचीचीही लागवड केली. एकरी चोवीस टन टरबूज निघाले. आणखी दोन तोडे होणार आहे.
शासनाने अहमदनगर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. कृषी महोत्सवात वसंतराव ठुबे यांनी टरबुजाचा स्टॉल लावला होता. सेंद्रीय टरबूज असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमणावर टरबुजाला मागणी केली. ७० हजार रूपयांची विक्री कृषि महोत्सवात झाली. कृषि महोत्सवामुळे टरबुजाला चांगले मार्केट मिळाले.
राहुरी व ब्राम्हणी येथेही सेंद्रीय टरबुजाला चांगली मागणी होती. ग्राहक खुश झाले व चांगल्या प्रकारे वसंतराव ठुबे यांना अर्थप्राप्ती झाली. ठिबक व मल्चींगचा वापर केल्याने पाण्याची बचत झाली़ गवत कमी प्रमाणावर आले. रोगाचा प्रादुर्भावही कमी झाला, याशिवाय टरबुजाचे दर्जेदार उत्पादनही घेता आले. विद्राव्य खते ठिबकच्या माध्यमातून देता आले. टरबुज पीक घेताना मिरचीचेही आंतरपीक घेण्यात आले. टरबुजाचे पीक संपण्याच्या मार्गावर असताना मिरचीचा तोडा सुरू झाला आहे. मिरचीला ५० रूपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. टरबूज व मिरची पीक घेताना वसंतराव ठुबे यांना शिवकुमार कोहकडे व डी.पी.गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
बहुपीक पध्दती
वसंतराव ठुबे हे शेतामध्ये एकाच पिकावर अवलंबून राहत नाही. टरबूज-मिरची पिकांबरोबरच त्यांनी कांदा बीज उत्पादन घेतले, ऊस, कांदा व गहू ही पिके घेतली.बहुपीक पध्दती अवलंबिल्यामुळे एखाद्या पिकाला कमी भाव मिळाल्यास त्याची कसर दुस-या पिकातून भरून निघते.शेतीमालाचे भाव कोसळत असताना ग्राहकांची गरज ओळखून विविध पीक घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे,असे ठुबे यांनी सांगितले.