अनाथ बहिणींना मिळाले पोलीस भाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:12+5:302021-08-23T04:24:12+5:30
जामखेड : तालुक्यातील मोहा फाटा येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील मुलींनी जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी ...
जामखेड : तालुक्यातील मोहा फाटा येथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातील मुलींनी जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना रविवारी राख्या बांधल्या. रक्षाबंधनानिमित्त या अनाथ बहिणींना पोलीस भाऊ मिळाले.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड उपस्थित होते. पोलीस रात्रंदिवस आपल्या परीने सेवा बजावतात. हे करताना असंख्य पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या हाताने राखी बांधता येत नाही. आज बहिणींची कमी निवारा बालगृहातील या अनाथ मुलांनी भरून काढली, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी अनाथ, निराधार माता-भगिनींचा भाऊ म्हणून ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने आम्ही निश्चित काम करत राहू, अशी ग्वाही दिली.
संस्थेचे संचालक बापू ओहोळ म्हणाले, आधुनिक जगातील स्त्रीने रक्षाबंधन नव्हे तर रक्षा स्वातंत्र्य या गोष्टीचा पुरस्कार करायला हवा. स्त्रीही सक्षम आहे. या गोष्टीचा अंगीकार आधुनिक स्त्रीने करून एक नवा पायंडा पाडावा.
यावेळी प्रा. जालिंदर यादव, प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, राकेश साळवे, राजू शिंदे, विकास साळुंके, वैशाली मुरूमकर आदी उपस्थित होते. यावेळी येथील आरोपींनाही राख्या बांधण्यात आल्या.
निवारा बालगृहात अनाथ, निराधार, वंचित, लोककलावंत, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटके विमुक्त, आदिवासी घटकातील ७१ मुला-मुलींची सोय करण्यात आली आहे. बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. तरीही हा प्रकल्प सुरू असून तो जामखेडच्या वैभवात भर टाकणारा शैक्षणिक प्रकल्प आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
----
२२ जामखेड पोलीस
निवारा बालगृहातील अनाथ मुलींनी जामखेड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.