अन्यथा तलाठी, ग्रामसेवकांवरच होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:07+5:302021-09-27T04:23:07+5:30
संगमनेर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींना त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात ...
संगमनेर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींना त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. तसेच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. याबाबत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी आदेश काढले आहेत. त्या दृष्टीने तलाठी आणि ग्रामसेवकांना अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावरच कारवाई होणार आहे. तहसीलदार निकम यांनी आदेश काढले आहेत.
संगमनेर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आरटीपीसीआर स्वॅब दिलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी तालुक्यातील तलाठी यांच्यावर आहे. त्यानुसार प्रत्येक तलाठ्याने आपल्या कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर स्वॅब दिलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवावे. स्वॅब दिलेली व्यक्ती इतरत्र आढळून येणार नाही याची खबरदारी घ्यावी. संबंधित व्यक्ती इतरत्र कुठेही आढळून आल्यास त्या गावच्या तलाठ्याविरोधात कारवाई होणार आहे. तसेच संगमनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती घरीच राहून कोरोनाचे उपचार घेणार नाही. ज्या गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात आढळून येतील तेथील ग्रामसेवकावर कारवाई होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
-----------------
परवानगी नसताना उपचार नको
संगमनेर तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर सीसीसी अथवा डीसीएचसीची परवानगी नसताना त्यांच्या रुग्णालयात उपचार करू नये. तसेच रुग्णाला घरीच राहून उपचार घेण्याबाबत सल्ला देऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधित डॉक्टर विरोधातही आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होणार आहे, असेही आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी काढले आहेत.