पोलिसांविरूध्द उद्रेक
By Admin | Published: May 31, 2014 11:44 PM2014-05-31T23:44:05+5:302014-06-01T00:23:46+5:30
कुळधरण : दरोड्यानंतर घरफोड्या व रस्तालुटीच्या सत्रामुळे जेरीस आलेल्या कुळधरणकरणांच्या भावनांचा बांध शनिवारी फुटून कर्जत-श्रीगोंदा मार्गावरील कुळधरण चौफुल्यावर दीड तास रास्ता रोको
कुळधरण : दरोड्यानंतर घरफोड्या व रस्तालुटीच्या सत्रामुळे जेरीस आलेल्या कुळधरणकरणांच्या भावनांचा बांध शनिवारी फुटून कर्जत-श्रीगोंदा मार्गावरील कुळधरण चौफुल्यावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले व कर्जत पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध केला. यावेळी गावात बंदही पाळण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून चोरट्यांनी कुळधरणला ‘लक्ष्य’ केले आहे. मात्र पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हल्लेखोर मोकाट फिरत असल्याने गावकर्यांच्या भावना तीव्र आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजता कुळधरण, सुपेकरवाडी, कोपर्डी येथील गावकरी रस्त्यावर उतरले. व कर्जत-श्रीगोंदा मार्गावरील वाहतूक दीड तास रोखली. खाकीवर्दीभोवती गराडा दहाच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित चिंतले फौजफाट्यासह कुळधरण येथे आले. गाडीतून खाली उतरताच गावकर्यांनी खाकीवर्दीभोवती गराडा घातला. सुपेकर कुटुंबियांवर हल्ला करणारे हल्लेखोर मोकाट असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड यांनी चिंतले यांना धारेवर धरले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अशोक जगताप, बाळासाहेब सुद्रिक, मंगेश पाटील, सुधीर जगताप यांनी प्रश्नांचा भडीमार करीत पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. पोलिसांच्या गाडीला उशीर का? रात्री नऊपासून चोरटे घरावर दगडफेक करुन घरफोड्या करतात. तरी पोलीस गस्तीची गाडी रात्री बारानंतर का येते? असा सवाल सुपेकर दरोड्याच्यावेळी मारहाण करुन घरात कोंडून ठेवण्यात आलेले आबासाहेब सुपेकर यांनी केला. १४ जणांविरुध्द गुन्हे कुळधरण येथे रास्ता रोको करणार्या चौदा प्रमुख आंदोलकांवर तसेच १०० अज्ञातांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कर्जत पोलिसांनी गुन्हे दाखल केले. (वार्ताहर)आंदोलनप्रसंगी गावकर्यांच्या भावना तीव्र होत्या. गावात रहाणार्या व संशयास्पद हालचाल असलेल्या, रात्री-अपरात्री फोनवरुन माहिती पुरविणार्या ‘त्या’ महिलेला अटक करा, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा संतप्त आंदोलनकर्त्यांनी घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंतले यांनी संमती दर्शविल्याने साडेदहाच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलीस ‘त्या’ महिलेच्या घराकडे निघाले, मात्र संतप्त शेकडो ग्रामस्थ धावतच पोलिसांच्या मागे आले. पोलिसांनी गावकर्यांना जगदंबा मंदिरानजीक रोखले. त्यानंतर पोलीस पाटलाच्या सहकार्याने पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात आणले.सुपेकर यांच्या व्यथा चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोपट सुपेकर यांना मंगेश पाटील, उपसरपंच सतीश कळसकर यांनी पोलिसांसमोर आणले. अंधार पाहिला, बॅटरी चमकली तरी भीती वाटते. तेव्हापासून घरातील कोणीही शेतात जाण्याचे धाडस झाले नाही, आम्हाला संरक्षण द्या... अशा शब्दात सुपेकर यांनी व्यथा मांडल्या.हल्लेखोरांना पकडू सुपेकर दरोड्यातील आरोपींना आठ दिवसात अटक करु. कुळधरण येथून ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी सुरु असून तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अजित चिंतल सहाय्यक पोलीस निरीक्षक, कर्जत