कोरोनानंतर डोळ्यांच्या आजाराचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:49+5:302021-05-11T04:20:49+5:30

श्रीरामपूर : कोरोनातून बचावलेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात बुरशीजन्य आजाराच्या काही केसेस जिल्ह्यात समोर आल्या आहेत. वेळेवर निदान होऊन ...

Outbreaks appear to be exacerbated during coronary heart disease | कोरोनानंतर डोळ्यांच्या आजाराचा प्रादुर्भाव

कोरोनानंतर डोळ्यांच्या आजाराचा प्रादुर्भाव

श्रीरामपूर : कोरोनातून बचावलेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात बुरशीजन्य आजाराच्या काही केसेस जिल्ह्यात समोर आल्या आहेत. वेळेवर निदान होऊन उपचार मिळाले नाहीत तर यात डोळे निकामी होण्याचा यामध्ये धोका आहे. जिल्हा प्रशासनाने या नव्या आजाराची दखल घेतली असली तरी अद्याप नेमक्या रुग्णांची आकडेवारी मात्र एकत्रित केली गेली नाही.

जिल्ह्यातील प्रत्येक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण सापडत आहेत. पुढील काळात यात आणखी वाढ होण्याचा धोका संभवत आहे. एकट्या श्रीरामपूर शहरात डोळ्यांची पाच ते सात नामांकित रुग्णालये आहेत. तेथे प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. जिल्ह्यामध्ये शंभराहून अधिक रुग्ण असण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र केवळ खासगी रुग्णालयातच यावर उपचार केले जात असल्याने एकूण बाधितांची संख्या समजू शकलेली नाही.

----

काय आहे म्युकरमायकोसिस

कोरोनातून उपचारांनंतर बरे झालेल्या मात्र मधुमेह, किडनी किंवा कॅन्सरच्या रुग्णांना हा त्रास जाणवत आहे. यामध्ये प्रामुख्याने डोळे किंवा नाकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होतो. डोळ्यांची नस निकामी होण्याचा यात धोका संभवतो. डोळे लाल होणे, खाज येणे, ताप, उलट्या ही म्युकरमायकोसिसची प्रारंभीची लक्षणे आहेत. मात्र वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळे निकामी होतात. मेंदूमध्ये हा आजार जडला तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

-----

उपचार लाखोंच्या घरात

म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. त्याकरिता न्यूरोसर्जनची आवश्यकता पडते. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर पुढील इलाजाकरिता नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णाला हलवावे लागते, अशी माहिती श्रीरामपूर येथील डॉक्टर पराग तुपे यांनी दिली.

-----

मधुमेह विकाराच्या कोविड रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आढळून आला आहे. त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर

----

माझा भाऊ सूर्यकांत परदेशी हा ३८ वर्षांचा आहे. नगर शहरातील खासगी रुग्णालयात तो कोविडवर उपचार घेत असून अतिदक्षता विभागात आहे. मधुमेहाचा त्याला त्रास आहे. त्याच्या डोळ्यांची नजर कमी झाली असून डॉक्टर त्याच्या तपासण्या करत आहेत.

- संतोष परदेशी, श्रीरामपूर

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.