पावसाळ्यात साथीच्या आजारांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:46+5:302021-08-22T04:24:46+5:30
पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे, अडगळीची जागा, सभोवतालच्या मोकळ्या जागेतील गवत अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार होते. ...
पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे, अडगळीची जागा, सभोवतालच्या मोकळ्या जागेतील गवत अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार होते. या डबक्यांमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. या डासांमुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यूसारखे आजार बळावण्याची शक्यता वाढली आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने गॅस्ट्रो, कॉलरासारख्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. वातावरणातील बदल, प्रदूषित हवाही या आजाराचे प्रमुख कारण ठरत आहे. परिणामी काही दिवसांपासून शहरासह पठार भागात सर्दी, खोकला, ताप या आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
सद्यस्थितीत संगमनेर तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र, पूर्वीपेक्षा कोरोना रुग्णसंख्या कमी असल्याने पूर्वीच्या तुलनेत तालुक्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. परंतु, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.
..............
पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला असे आजार होतात. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार सुरू करावेत. सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळावे.
- डॉ. राहुल आहेर, साईसिद्धी हॉस्पिटल, घारगाव (संगमनेर)