संतापजनक : कोरोनाने मयत झालेल्या तरुणाची बळजबरीने मालमोटार घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 05:15 PM2021-05-04T17:15:08+5:302021-05-04T17:15:23+5:30
एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात बुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे
संगमनेर : एका आदिवासी तरूणाचा कोरोनाने मृत्त्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात
बुडालेले होते. तरीदेखील एका इसमाने कर्ज वसुलीसाठी तरूणाच्या कुटुंबियांकडून बळजबरीने मालमोटार ताब्यात घेतली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात हा प्रकार घडला आहे.
संगमनेरातील येठेवाडी परिसरातील बजरंग आगिवले या तरुणाचा नुकताच कोरोनाने मृत्त्यू झाला. कुटुंबियांकडे एक
मालमोटार आहे. ती मालमोटार कोल्हापूर येथे माल घेऊन गेली असता घारगाव येथील एका इसमाने ही मालमोटार तेथून बळजबरीने ताब्यात घेतली. आगिवले यांना मी कर्ज दिलेले आहे. मला ते वसूल
करायचे आहे, असा पवित्रा या इसमाने घेतला आहे. यामुळे आगिवले कुटुंब घाबरुन गेले आहे. हे कुटुंब
आदिवासी आहे. आगिवले यांची पत्नी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तेथील एक
उपनिरीक्षक व पोलिसाने या कुटुंबाची फिर्याद दाखल करुन घेण्यास नकार देत त्यांनाच उलट
सुनावले.
विशेष म्हणजे ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, तो इसम यावेळी पोलीस उपनिरीक्षकांसोबत
बसला होता. काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त व्यक्त केला आहे. ‘लोकमत’ने
घारगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक पाटील यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणी चौकशी
करुन तत्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.