अहमदनगर जिल्हा रेड झोनच्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:45+5:302021-05-26T04:21:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा सर्वाधिक आहे, अशा जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा सर्वाधिक आहे, अशा जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा रेट २५ टक्के असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे, मात्र दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला १ जूननंतर दिलासा मिळणार की निर्बंध आणखी वाढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे, तर काही जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यात सरसकट लॉकडाऊन करण्याऐवजी जिल्हानिहाय निर्बंध निश्चित करण्यात येणार आहेत. याबाबत राज्य सरकार काम करीत असून, संपूर्ण राज्यासाठी एकच नियमावली असणार नाही. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध कडक करायचे की नाही, याबाबतचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे राहणार आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यांत अहमदनगरचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्के असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे मत सरकारने व्यक्त केले आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. एप्रिल महिन्यात दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ४० ते ५० टक्के झाला होता. तरीही एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा पॉझिटिव्हिटी रेट ३२ टक्के दर्शविण्यात आला होता. प्रशासनाकडून आतापर्यंत झालेल्या चाचण्याची संख्या लक्षात घेऊन पॉझिटिव्हिटी रेट काढला जात आहे. त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्के दिसत आहे.
-------
पॉझिटिव्हिटी रेटचा असा आहे फरक
तारीख/ चाचण्या /बाधित रुग्ण / एकूण संख्येनुसार पॉझिटिव्हिटी रेट/ दैनंदिन रुग्णसंख्येनुसार पॉझिटिव्हिटी रेट /
२२ मे/१५९०२/१८५६/२५.४८ टक्के/११.६७ टक्के
२३ मे /१७६७३/१८५१/२५ टक्के/१०.४७ टक्के
२४ मे/ २२०३८/२२६३/२४.६८ टक्के/१०.२६ टक्के
-------
चाचण्यांची संख्या वाढली
अहमदनगर जिल्ह्यामध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी दहा हजार चाचण्या व्हायच्या. त्यामध्ये ३२ टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता, मात्र १ मेनंतर चाचण्यांची संख्या जवळपास दुप्पट करण्यात आली आहे. सध्या दररोज किमान २० हजार चाचण्या होत असल्याचे दिसून आले आहे. तरीही रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा रेट दहा टक्क्यांच्या जवळपास आलेला आहे.
------
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, मात्र याबाबत नागरिकांनी गाफील राहता कामा नये. जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर १ जूननंतर निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
------------
एकूण चाचण्या दहा लाख पार
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण १० लाख १६ हजार २३१ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ५० हजार ७७९ इतके जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रेट २४.६८ टक्के इतका आहे. एकूण ४५ लाख लोकसंख्येपैकी चाचण्यांचे प्रमाण हे २२ टक्के असल्याचे दिसते.