थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई!
By अरुण वाघमोडे | Updated: September 10, 2023 19:43 IST2023-09-10T19:40:43+5:302023-09-10T19:43:30+5:30
आता प्रभाग अधिकाऱ्यांसह सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करत वसुली करा, अन्यथा कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.

थकबाकी अडिचशे कोटी; कामचुकारांवर होणार कारवाई!
अहमदनगर: महापालिकेची मालमत्ताधारकांकडे अडिचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या वर्षी तीनवेळा शास्तीमाफी देऊनही अवघी बारा कोटी रुपयांची वसुली झाली आहे. आता प्रभाग अधिकाऱ्यांसह सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करत वसुली करा, अन्यथा कामचुकारांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.
मनपात आयुक्त जावळे यांनी वसुली विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, कर वसुली विभागप्रमुख प्रमुख विनायक जोशी यांच्यासह वसुली कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त म्हणाले वसुलीचे वेळापत्रक तयार करा, कराची थकबाकी असणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करा, एक लाख रुपयाच्या पुढील थकबाकी असणाऱ्या नागरिकांची यादी तयार करून त्यांना नोटीस द्या, शहरात ओपन प्लॉटधारकांची थकबाकी असेल तर त्यांच्या सातबारा व सिटीसर्वेला बोजा लावण्याचे काम करा, न्यायप्रविष्ट असणाऱ्या प्रकरणाबाबत वकिलांशी तातडीने चर्चा करावी.
दिलेल्या उदिष्टापेक्षा ३० टक्क्यांहून कमी वसुली झाली, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जावळे यांनी दिला.