राहुरीत एटीएम फोडून १५ लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:45 PM2017-10-30T13:45:18+5:302017-10-30T13:48:37+5:30
राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष ...
राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता़ तसेच एटीएममध्ये सीसीटीव्ही बसविलेला नाही.
रविवारी पहाटे याच बस स्थानकाशेजारील आईस्क्रीमच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही चोरट्यांनी काढून नेला होता. एटीएमची पाहणी करुन चोरटे त्यादिवशी निघून गेले. सोमवारी ते चोरटे पुन्हा आले़ त्यांनी नगर-मनमाड रोडवर चारचाकी कार लावली़ तेथून चोरटे पायी बसस्थानकावर आले. समोरच असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चोरटे घुसले़ हे एटीएम चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कापले. आतील पैशाचा ट्रे घेऊन चोरटे पसार झाले. हे एटीएम कापतात ते शॉर्टसर्कीटमुळे जळाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या एटीएममध्ये सुमारे १५ लाख रुपये रक्कम असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दरम्यान या एटीएमपासूनच काही अंतरावर असलेल्या हॉटेलच्या कॅमेºयात हे चोरटे कैद झाले आहेत. त्यात चोरटे १ वाजून ३६ मिनिटांनी राहुरीतील नगर-मनमाड रस्त्यावर कार लावताना दिसत आहेत. कारमध्ये एक ड्रायव्हर बसलेला दिसत असून, इतर तिघेजण एटीएमच्या दिशेने येतात दिसतात. त्यांच्या हातात कटरसारखे काहीतरी असल्याचे दिसते. मात्र, सीसीटीव्ही व चोरट्यांमधील अंतर जास्त असल्यामुळे या सीसीटीव्हीत चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे ओळखू येत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले़ घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधीकारी अरुण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक एल टी भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते़ मात्र, श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.