नगर तालुक्यात साडेसहा हजार रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:56+5:302021-04-26T04:17:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाचे भय अजून संपलेले नाही. तालुक्यात आतापर्यंत ७ हजार ९७७ रुग्णांना कोरोनाची ...

Over six and a half thousand patients overcome corona in Nagar taluka | नगर तालुक्यात साडेसहा हजार रुग्णांची कोरोनावर मात

नगर तालुक्यात साडेसहा हजार रुग्णांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क

केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाचे भय अजून संपलेले नाही. तालुक्यात आतापर्यंत ७ हजार ९७७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, गेल्या आठवडाभरातच २ हजार ११८ इतके रूग्ण वाढले आहेत. मात्र, असे असले तरी तालुक्यातील ६ हजार ५५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नगर शहराजवळ असणारा आणि दैनंदिन कामांसाठी रोजचा शहराशी संबंध येणारा म्हणून नगर तालुका ओळखला जातो. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे कोरोनाच्या वर्षभरातील पहिल्या टप्प्यात ४ हजार ४१५ इतके बाधित रूग्ण होते. मात्र, एप्रिलमध्ये सुरू झालेला कोरोनाचा दुसरा टप्पा तालुक्यासाठी धोकादायक ठरला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात तालुक्यात ३ हजार ४९४ इतके रूग्ण वाढले आहेत. गेल्या आठवडाभरातच तालुक्यात २ हजार ११८ इतके रूग्ण वाढले आहेत. तालुक्यात आतापर्यंत १२२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तालुक्यात सध्या गावोगावी कोरोना तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

तालुक्यात प्रशासनाने ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यात पाच ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. तसेच गावोगावी विलगीकरण केंद्र सुरू झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गावपातळीवरही कडक उपाययोजना हाती घेण्यात आल्याने तालुक्यात येत्या काही दिवसात कोरोनावर नियत्रंण मिळवता येईल, अशी आशा प्रशासनाला आहे. तालुक्यात सध्या दीड हजार सक्रिय रुग्ण असले, तरी आतापर्यंत ६ हजार ५५४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

---

तालुक्यातील कोरोनाबाधित दहा गावे

नागरदेवळे - ४९३, अकोळनेर - ३६७, जेऊर - ३६४, वडगाव गुप्ता - ३३६, नवनागापूर - ३३५, बुऱ्हाणनगर - २८९, दरेवाडी - २७१, वाळकी - २३६, सारोळा कासार - २२१, अरणगाव - २१६.

---

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रूग्ण

जेऊर - ११२९, चास - १०८०, देहेरे - १०६५, देवगाव - १००९, वाळकी - ८८०, टाकळी खातगाव - ८४३, टाकळी काझी - ८०४, मेहेकरी - ६०८, रूई - ५५९.

--

या गावांनी रोखले कोरोनाला...

नगर तालुक्यातील ३९ गावांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकही रूग्ण नव्हता. दुसऱ्या आठवड्यापर्यंत १६ गावांमध्ये एकही रूग्ण आढळला नाही. मात्र, तिसऱ्या आठवड्यात सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले. मात्र, असे असले तरी पांगरमल, माथणी, बाळेवाडी, जांब, खांडके, पिंप्री घुमट, पारगाव मौला, हातवळण या गावांनी कोरोनाला रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे.

---

आमच्या गावची लोकसंख्या १ हजार २०० आहे. गावातील जवळपास सर्वचजण बकऱ्या व मेंढपाळ आहेत. दिवसभर माळरानावर एकटे मेंढ्या घेऊन जाणे हा त्यांचा दिनक्रम आहे. कोणाशी कोणाचा संपर्क नाही. सामूहिकरित्या एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम कटाक्षाने पाळले जातात. यामुळे गावात आतापर्यंत कोरोनाचे केवळ ३ रूग्ण सापडले आहेत.

- रभाजी सूळ,

सरपंच, पिंप्री घुमट

Web Title: Over six and a half thousand patients overcome corona in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.